Wed, May 19, 2021 05:09
कोरोनाबाधित ३० महिलांची यशस्वी प्रसूती 

Last Updated: May 06 2021 2:27AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 300 असून यामध्ये 30 गर्भवती महिलांचा समावेश आहे. मार्चपासून आतापर्यंत 30 गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आल्याचे बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याचा आरोग्ययंत्रणेवर ताण येत आहे. कोरोना रोखण्यासाठी कडक नियमावली करूनही नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. हे रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. वाढती रुग्णसंख्या पाहिल्यास ही धोक्याची सूचना आहे. भविष्यात याचे परिणाम अधिक भयानक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे.

जिल्हा  रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही. 13 हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. यामध्ये दिवसातून दोनवेळा ऑक्सिजन साठविण्यात येत आहे. रुग्णालयात 800 ऑक्सिजन खाट आहेत. यापैकी 300 खाट कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत. सामान्य रुग्णांसाठी 1 ते 2 लिटर तर कोरोना रुग्णांसाठी 8 ते 30 लिटर ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजनाचा तुटवडा निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी 20 हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हे काम प्रगतीपथावर असून ऑक्सिजन खाटांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे डॉ. दास्तीकोप यांनी सांगितले. 

प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच?

प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. संचालकांकडून रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात निर्माण झालेल्या त्रांत्रिक अडचणी दूर करण्यात येत नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.