Wed, May 19, 2021 04:32
बाराच्या आत कोण घरात?

Last Updated: May 05 2021 2:23AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे केवळ दुपारी 12 पर्यंतच जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी परवानगी दिली आहे. पण, त्यानंतरही अनेकजण  फिरताना दिसत आहेत. सुरक्षित अंतर, मास्क, दुकानात सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. 

सरकारने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 6 ते 10 ऐवजी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत दोन तासांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, वेळेत खरेदी करून घरी परतण्याऐवजी बेळगावकर 12 नंतरही बाजारात रेंगाळत असल्याने गर्दीचा रोज नवा उच्चांक होत आहे. पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बेळगावसह राज्यात कोरोनाचा वाढत कहर रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. ग्राहक आणि व्यापारी कोरोना नियमांचे उल्लंघन करूनही पोलिस मात्र  कारवाई करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.

मास्क घातल्याने नाक, तोंड झाकले पाहिजे. मात्र, काही ग्राहक नाकाखाली, हनुवटीवर मास्क लावून बाजारात फिरत आहेत. रस्त्याकडेला बसून व्यापार करणारी मंडळीदेखील ग्राहकांचे अनुकरण करत आहे. मास्कशिवाय प्रवेश नाही असे फलक दुकानाबाहेर व्यापार्‍यांनी लावले आहेत. मात्र, मास्क न लावता आलेल्या ग्राहकालादेखील दुकानात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना याचा धोका निर्माण झाला आहे.