Fri, Feb 26, 2021 06:49
खानापुरात एसटी खात्याचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Last Updated: Feb 24 2021 2:30AM

खानापूर : पुढारी वृत्तसेवा

धूळदाण उडालेल्या बेळगाव-पणजी महामार्गामुळे बस वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. त्यातच मंगळवारी एका बसमध्ये तब्बल 100 हून अधिक विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊन दोन विद्यार्थिनी बेशुद्ध होऊन पडल्याची घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. पैकी एका विद्यार्थिनीला बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करावे लागले. 

खानापूर-रामनगर मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सोमवारी रास्ता रोको आंदोलन झाले. परिणामी, मंगळवारपासून बससेवा सुरू करण्यात आली. सकाळी 8 वाजता खानापूर आगाराच्या रामनगर-खानापूर बसमध्ये रामनगरहून 40 विद्यार्थी व प्रवासी चढले. लोंढा येथे पुन्हा तेवढेच प्रवासी बसमध्ये आले. तिथून पुढे प्रत्येक गावाच्या थांब्यावर चार-पाच प्रवासी व विद्यार्थी चढल्याने बसमध्ये गर्दी झाली.

सावरगाळीनजीक रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे धुळीचे लोट निर्माण झाले आहेत. या धुळीमुळे कपडे घाण होतात. त्यामुळे प्रवासी बसच्या खिडक्या बंद करतात. आजही तोच प्रकार घडला. दरवाजा व खिडक्या बंद झाल्याने आधीच गर्दी झालेल्या बसमध्ये प्राणवायू अपुरा पडू लागला. त्यातच मोठ्या खड्ड्यांमुळे बस हेलकावे खाऊ लागली. यावेळी बसमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने गायत्री श्रीकांत आचारी व करुणा पाटील (दोघी रा. लोंढा) या दोन विद्यार्थिनी बेशुद्ध होऊन कोसळल्या. 

वाहक व चालकाने प्रसंगावधान राखून बस कुठेच न थांबता थेट खानापूर सरकारी रुग्णालयात आणली. त्यानंतर  वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यात आली. बेशुद्ध विद्यार्थिनींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. गायत्री हिच्यावर प्राथमिक उपचार करून बेळगाव सिव्हिल इस्पितळात पाठवण्यात आले. करुणा हिच्यावर खानापुरातच उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनंत पाटील, पंडित ओगले, जॉर्डन गोन्साल्विस यांनी दवाखान्याकडे धाव घेतली. त्यानंतर एसटी आगार व्यवस्थापकांना बोलावून चांगलेच धारेवर धरण्यात आले. 

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न तुमच्या अंगलट येऊ शकतो, असा सज्जड इशारा देऊन रामनगर-खानापूर मार्गावर जादाच्या बस सोडण्याची मागणी करण्यात आली.

कर्मचारी अपुरे

खराब रस्त्यामुळे रामनगर मार्गावर बस नेण्यास कोणीही चालक व वाहक तयार होत नाही. त्यातच कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बस फेर्‍या कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा !

रामनगर, लोंढा भागातून येणारे विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. सध्या पॅसेंजर रेल्वे सेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. सातनाळी, माचाळी, घोसे यासारख्या दुर्गम भागातून लोंढा व रामनगर येथे येऊन बस पकडावी लागत असल्याने अनेक विद्यार्थी सकाळी उपाशीपोटी घराबाहेर पडतात. त्यात दीड तास बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने दररोज 1-2 विद्यार्थी चक्कर येऊन खाली कोसळतात. पण सांगणार कोणाला? आजचा प्रसंग जीवावर बेतणारा ठरणार असता. वेळीच उपचार मिळाल्याने दोघी विद्यार्थिनी सुखरूप आहेत

पंडित ओगले भाजप नेते