Sat, Aug 15, 2020 12:40होमपेज › Belgaon › बदामीत निकालाची उत्सुकता 

बदामीत निकालाची उत्सुकता 

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 9:15PMबदामी : प्रतिनिधी 

केवळ बदामीचेच नव्हे तर राज्याचे लक्ष या मतदार संघाच्या निकालाकडे लागले आहेत. बदामीतील मतदार बनशंकरी देवीवर विश्‍वास ठेवून निकालाची प्रतीक्षा करत आहेत. बदामीमध्ये 74.5 टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथूनही निवडणूक लढविलेली आहे. यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. 

येथून कोण विजयी होणार हे आम्ही बनशंकरी देवीवर सोपविले आहे. देवी देईल तो कौल आम्हाला मान्य आहे. देवीच्या कृपेशिवाय कोणीही जिंकू शकत नाही. ही आमची धारणा असल्याचे येथील मतदार म्हणतात. बदामीतूनही लढण्याची घोषणा सिद्धरामय्या यांनी केल्यानंतर या मतदार संघाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. त्यांचे आव्हान पेलण्यासाठी भाजपने बाहुबली बी. श्रीरामलु यांना तर निजदने स्थानिक हनमंत मावीनमरद यांना रिंगणात उतरवले आहे. 

भाजप आणि काँग्रेसला विजयाची समान संधी आहे. तरीही विजयी होणार्‍या उमेदवाराचे मताधिक्य काठावरचे असेल. सर्वच पक्षांनी बदामीचे आव्हान पेलण्यासाठी झोकून प्रचार केला आहे, असे तेथील शिक्षक बसवराजू मुलीमनी यांनी म्हटले आहे. 

युवक, शेतकरी आणि विणकर यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीने आजवर भरकस प्रयत्न केलेले नाहीत. त्यांच्या समस्या सोडविण्यात स्वारस्य दाखविले नाही. यामुळे भाजप किंवा काँग्रेस उमेदवाराला मतदान झाल्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांनी रोजगार निर्मितीचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे निकाल कदाचित वेगळा लागू शकेल, असे मत रमेश नवलगुंद या बेलूर येथील शेतकर्‍याने व्यक्त केले आहे. 

आमच्या समस्यांची जाण असलेल्या स्थानिक उमेदवाराला आजवर आम्ही निवडून आणत होतो. परंतु आमची मते फुकट गेली. यावेळी स्थानिक उमेदवाराला टाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचे भरमगौडा अडूर या विणकराला वाटते.