Sat, Aug 08, 2020 14:36होमपेज › Belgaon › ‘रोहयो’ला प्रतिसाद, उद्दिष्टपूर्ती 12 दिवसांत

‘रोहयो’ला प्रतिसाद, उद्दिष्टपूर्ती 12 दिवसांत

Published On: Jun 14 2019 1:51AM | Last Updated: Jun 13 2019 9:54PM
बेळगाव : प्रतिनिधी

पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागात जूनच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात रोहयो कामाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. बेळगाव तालुक्याने जून महिन्याची उद्दिष्टपूर्ती केवळ 12 दिवसा’त पूर्ण केली असून यामुळे जिल्ह्यात तालुका पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोहयो  केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. यातून  ग्रामीण भागात मूलभूत  आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेतली आहेत. याला भरभरून प्रतिसाद लाभत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव तालुक्यात मान्सूनचे आगमन होते. परंतु यावर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने आगमन लांबले आहे. परिणामी नागरिकांनी रोहयो कामांना प्राधान्य दिले आहे. यामुळे  तालुक्याची महिन्याची उद्दिष्टपूर्ती केवळ दोन आठवड्यात झाली आहे. बेळगाव तालुक्याला जून महिन्यासाठी 2 लाख 92 हजार मानवदिन इतके उद्दिष्ट आहे. याची उद्दिष्टपूर्ती 12 जूनपूर्वीच  झाली आहे. 12 पर्यंत तालुक्यात 3 लाख 37  हजार मानवदिन काम झाले आहे. ही उद्दिष्टपूर्ती 115.30 टक्के इतकी आहे.

तालुक्यातील 59 ग्रा. पं. कार्यक्षेत्रात ता. पं. ने रोहयोची कामे हाती घेतली आहेत. यासाठी 74 हजार 303 जॉबकार्डची नोंदणी असून यापैकी 13 हजार 72 कामगार कार्यरत आहेत. यामध्ये कडोली ग्रा. पं. कार्यक्षेत्रात सर्वाधिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बैलहोंगल दुसर्‍या स्थानी

बेळगाव खालोखाल बैलहोंगल तालुक्यात रोहयो कामांना प्रतिसाद लाभला आहे. याठिकाणी 95.23 टक्के कामाची उद्दिष्टपूर्ती 12 जूनपर्यंत झाली आहे. तर सर्वात कमी प्रतिसाद रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यात लाभला आहे. रामदुर्ग येथे 45.53 टक्के तर सौंदत्ती तालुक्यात 49.80 टक्के उष्टिपूर्ती झाली आहे. जिल्ह्यात ही नोंद सर्वात कमी आहे.

पावसाळ्यात अडथळा

जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर तालुक्यात जून पासून पाऊस बरसतो. पावसाचा जोर वाढल्यानंतर रोहयो कामगार शेती कामात गुंततात.  याचा फटका रोहयोच्या कामांना बसतो. पावसाच्या हंगामात उद्दिष्टपूर्ती करताना अधिकार्‍यांना कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर कामेदेखील उपलब्ध करून देणे ग्रा. पं. ना शक्य होत नाही. 

जिल्ह्याची 18 टक्के उद्दिष्टपूर्ती

जिल्ह्याला 2019-20 या वर्षाकरिता ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याने 1 कोटी 35 लाख 42 हजार मानवदिनाचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये यापैकी 24 लाख 11 हजार मानवदिन काम 12 जून पर्यंत झाले आहे. 

ग्रामीण भागामध्ये रोहयोसंदर्भात पुरेशा प्रमाणात जागृती झाली आहे. यामुळे नागरिकांचा प्रतिसाद लाभत असून बेळगाव तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. पावसाळा सुरू होतो. यामुळे दोन महिने कामे संथगतीने सुरू असतात.
- मल्लिकार्जुन कलादगी, 
साहाय्यक कार्यकारी अधिकारी बेळगाव ता. पं.