Wed, Jun 23, 2021 01:05
पैसे उकळणार्‍या पोलिसावर खंडणीचा गुन्हा 

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे व्यापार थंडावल्याने व्यापारी आधीच ग्रासले आहेत. यातच केएसआरपीचा कॉन्स्टेबल दररोज येऊन पैसे व दुकानातील हव्या त्या वस्तू पोलिस कारवाईची भीती दाखवून नेत होता. याला वैतागलेल्या व्यापार्‍यांनी स्वतःहूनच या कॉन्स्टेबलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

सिद्धारूढ रामाप्पा वड्डर (39, रा. सेकंड बटालियन केएसआरपी, मच्छे) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मार्केट पलिसांनी खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यापार उदिम ठप्प आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून व्यापार्‍यांनी आपली आस्थापने बंद ठेवली आहेत. परंतु, सकाळी 6 ते 10 या वेळेतच आस्थापने उघडण्यासाठी मुभा दिली आहे. या चार तासांत म्हणावा तसा व्यापार होत नाही, तरीही व्यापारी रडतखडत त्यांचा व्यापार सुरू ठेवला आहे. लॉकडाऊन त्याला अनुसरून पोलिसांकडून आस्थापने बंद करण्याची सूचना असून याचा फायदा सिद्धारूढ उठवत होता. 

पैशासह कपड्यांचीही मागणी 

सिद्धारूढ हा बंदोबस्ताच्या नावाखाली शहरात आला होता. यावेळी सकाळच्या टप्प्यात तो पोलिस वेषात फिरून दुकाने बंद करण्याची सूचना करत असे. एखाद्या दुकानात जाऊन अजून का बंद केले नाहीस, असे विचारायचे व त्याच्याकडे पैशाची मागणी करायची, असे तो करत होता. अनेक कपड्यांच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत घुसून त्याने भीती दाखवून शर्ट, पॅन्ट फुकट नेले.  शिवाय घरी लागणारे जीवनावश्यक साहित्यही असेच उचलून नेण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरू होता. 

पंधरा दिवसांपासून प्रकार 

बाजारपेठेतील रस्त्यावरचे व्यापारी व दुकानदार आपल्याला घाबरतात हे लक्षात आल्यानंतर त्याने सातत्याने असा प्रकार सुरू केला. गेल्या पंधरा दिवसांपासून तो सतत त्याच-त्या दुकानांमध्ये जाऊन रक्कमेची मागणी करत होता. न दिल्यास तेथे असलेल्या वस्तू नेत होता. याला हे व्यापारी वैतागले होते. गुरूवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे काही दुकानांमध्ये शिरल्यानंतर व्यापारी एकवटले. या सर्वांनी त्याच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करताच तो भेदरला. यानंतर ही माहिती मार्केट पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.