Sat, Aug 15, 2020 12:47होमपेज › Belgaon › रमेश जारकीहोळींना मंत्रिपदाची ऑफर?

रमेश जारकीहोळींना मंत्रिपदाची ऑफर?

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 29 2019 12:11AM
बेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्वत: संपर्क साधून मंत्रिपदाची ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर रमेश यांनी पक्षामध्येही राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन भाजप वरिष्ठांची भेट घेतली. पण, कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याने त्यांचे बंड शमले. 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी पुन्हा आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. केवळ एकट्यानेच नव्हे तर आणखी काही आमदार पक्ष सोडतील असे त्यांनी सांगितले. पण, बंगळूर दौर्‍यावर असताना त्यांची कोणत्याच आमदाराने भेट घेतली नसल्याने ते एकाकी पडले. या घडामोडींमुळे ते कोणत्याहीवेळी आघाडीला धोका पोहोचवू शकतात, अशी भीती काही नेत्यांना आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांची समजूत घालण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसमध्ये काही घडामोडी घडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडणार असल्याचा हिशोब कुमारस्वामींनी घातला आहे. त्यामुळे ते प्रत्येक घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. एका घराण्यात दोघांना मंत्रिपद दिल्यानंतर आघाडीमध्ये निर्माण होणार्‍या समस्यांबाबत मुख्यमंत्री काही वरिष्ठांसोबत चर्चा करत आहेत.दरम्यान, रमेश यांनी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अशावेळी त्यांची मनधरणी करुन मंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडण्याचे आव्हान आघाडीतील नेत्यांसमोर आहे.