Sat, Aug 08, 2020 14:35होमपेज › Belgaon › जनार्दन रेड्डींच्या निवासांवर छापे

जनार्दन रेड्डींच्या निवासांवर छापे

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 08 2018 1:24AMबंगळूर : प्रतिनिधी 

भाजपचे नेते, माजी मंत्री गाली जनार्दन रेड्डी यांच्या तीन शहरांमधील निवासस्थानांवर पोलिसांनी बुधवारी छापे घालून तपास सुरू केला आहे. रेड्डींनी अटक होण्याचीही शक्यता आहे. ग्राहकांची शेकडो कोटींची फसवणूक केलेल्या कंपनीला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ससेमिर्‍यापासून वाचविण्यासाठी  जनार्दन रेड्डी यांनी 20 कोटी घेतल्याचे उशिरा उघडकीस आले आहे. जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्‍वासनही त्यांनी कंपनीला दिल्याने बुधवारी (दि. 7) सीसीबी पोलिसांनी बंगळूर, चित्रदुर्ग, हैदराबाद येथे रेड्डींच्या निवासांवर छापे घातले.

अँबिडेंट नामक कंपनीने दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सीसीबी पोलिस तपास करत असून कागदपत्रांच्या तपासणीवेळी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अंमल संचालनालयाकडून कंपनीची चौकशी होण्याची शक्यता होती. त्यापासून वाचण्यासाठी कंपनीतील काही जणांनी रेड्डींशी संपर्क साधला. त्यावर रेड्डींनी वीस कोटींची मागणी केली. त्यानंतर बळ्ळारीतील एका ज्युवेलर्सकडून 18.5 कोटींचे सोने खरेदी करून बनावट बिल घेण्यास रेड्डींनी कंपनीच्या लोकांना सांगितले. या प्रकरणात चौकशी करू नये म्हणून अंमल संचालनालयातील अधिकारी ब्रजेश यांना एक कोटीची लाच देण्यात आली. गत मार्च महिन्यात ही घटना घडली होती. या प्रकरणात अँबिडेंट कंपनीचा मालक फरिद, बिल्डर ब्रिजेश आणि रमेश कोठारी यांना अटक करण्यात आली. आता जनार्दन रेड्डींना अटकेसाठी जाळे पसरण्यात आल्याचे समजते.