Fri, Feb 26, 2021 06:01
बंगळूर सीसीबीचा गोकाकमध्ये छापा

Last Updated: Feb 24 2021 2:30AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक लोकसेवा आयोगाची (केपीएससी) प्रश्‍नपत्रिका फोडल्याप्रकरणी अटकेत असणारा  संशयित शिवलिंग पाटील याच्या गोकाक येथील दुकानावर बंगळूर सीसीबी पोलिसांनी छापा टाकून तपास केला. 

केपीएससीची एफडीए  (फर्स्ट डिव्हिजनल असिस्टंट -प्रथम दर्जा सहाय्यक) प्रश्‍नपत्रिका फुटल्याने आयोगाला परीक्षा रद्द करून लांबणीवर टाकावी लागली. त्यानंतर राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. मुख्य संशयित शिवलिंग पाटील याला मंगळूर  पोलिसांनी अटक केली. शिवलिंग हा गोकाकमध्ये कोचिंग सेंटर चालवत होता. केपीएसीचा कर्मचारी राचप्पा याच्या संपर्कात राहून तो परीक्षेबाबत माहिती मिळवत होता. परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांकडून लाखो रुपये वसूल करून परीक्षेआधी त्यांना प्रश्‍नपत्रिका पुरवत होता. 

गेल्या बुधवारी 17 फेब्रुवारीरोजी बंगळूर पोलिसांनी शिवलिंगला अटक केली. त्याची चौकशी करण्यात येत असून गोकाक येथील त्याच्या फर्निचर दुकान व  घरावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणात अणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा लवकरच उलगडा होणार आहे. शिवलिंगने आपल्या कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या उमेदवारांकडून प्रश्‍नपत्रिकेसाठी लाखोंची वसुली केल्याचे उघड झाले आहे. 

न्यायालयाने फटकारले 

काही दिवसांपूर्वी बंगळूर उच्च न्यायालयाने केपीएससीच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न उपस्थित करुन आयोगाला फटकारले  होते. वारंवार प्रश्‍नपत्रिका फुटीचा प्रकार व गैरकारभार पाहून आयोगच रद्द का करु नये, असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे हा मुद्दा राज्य सरकारसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. त्यामुळेच आता पेपरफुटीची सखोल चौकशी सुरू झाली आहे.