Sat, Aug 08, 2020 14:32होमपेज › Belgaon › उड्डाणपुलावरील धूमस्टाईल जीवघेणी 

उड्डाणपुलावरील धूमस्टाईल जीवघेणी 

Published On: May 20 2019 1:23AM | Last Updated: May 19 2019 11:24PM
बेळगाव : प्रतिनिधी

रेल्वे उड्डाणपूल एैसपैस बनल्याने येथून वाहन चालविणे सोयीचे बनले आहे. परंतु, वेगाची नशा चढलेल्या धूमस्टाईल तरुणाईसाठी मात्र हा पूल जीवघेणा ठरतो आहे. पुलाला थोडेसे अधिक वळण आणि रस्त्यावर आलेले पदपथ ही एक बाब कारण असली, तरी गेल्या चार महिन्यांत भरधावमुळे  येथे चौघांचा बळी गेला आहे. शिवाय काहीजण गंभीर व काही किरकोळ जखमी झाले आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी 4 मे रोजी आरपीडीडजवळील खोलीत राहणार्‍या आपल्या मित्राला भेटून रात्री अकराच्या सुमारास गोंधळी गल्लीतील आपल्या खोलीकडे येणार्‍या दोघा तरुणांची दुचाकी पदपथाला धडकून गंभीर अपघात झाला. यात मागे बसलेला मित्र जागीच ठार झाला तर चालक तरुणही गंभीर जखमी झाला. त्या आधीही शहापूरला यात्रेची तयारी करणारे काही तरुण रेल्वे स्थानकावर चहा पिण्यासाठी येत असताना दुचाकी पदपथाला धडकून एक ठार, दोघे गंभीर जखमी झाले. या दोन ठळक घटना असल्या, तरी येथे वारंवार अपघात घडताना दिसतात. 

अपघातामागे तांत्रिक कारणही

येथे घडणार्‍या अपघातांकडे बारकाईने पाहिले तर बहुतांश अपघात हे गोवावेस सर्कलकडून गोगटे सर्कलकडे येणार्‍या दुचाकींना झालेले आहेत. याचे कारण म्हणजे उड्डाणपुलाचे वळण म्हणावे लागेल. यो पुलाच्या बाजूला आलेल्या उड्डाणपुलाची जागा ही पूर्वीच्या उड्डाण पुलाइतकीच आहे. त्यामुळे पुलाची रूंदी वाढवताना सर्कलकडे पूल संपविण्यासाठी वरच्या बाजूला थोडेसे अधिक वळण घेतल्याचे दिसून येते. परिणामी त्याच्या बाजूचा पदपथ देखील तसाच वळणदार बनला आहे. गोवावेस सर्कलकडून भरधाव दुचाकी किंवा अन्य वाहन येते तेव्हा येथील वळणदार पदपथाचा वाहनधारकाला सहज अंदाज येत नाही. त्यामुळेच अनेक दुचाकी या पदपथाला धडकून नंतर बाजूच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यात ज्या तरुणांचा येथे बळी गेला आहे, तो अशा रितीने अपघात झाल्यामुळेच गेला, ही गंभीर बाब आहे.

नवीन पूल अस्तित्वात आल्यानंतर तो निश्‍चितच ऐसपैस व दुपदरी बनला आहे. साहजिकच येथून धूमस्टाईलने दुचाकी पळविणे तरुणांना  आवडत आहे. परंतु, या वळणावर पदपथ इतका धोकादायक आहे की त्याला थोडासा जरी दुचाकचा धक्का लागला की तोल जाऊन वाहन रस्त्यावर आदळू शकते आणि हे जीवघेणे अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आणणारे ठरू शकते. त्यामुळे सर्वच वाहन चालकांनी येथून वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

वळणावर अपघात 

गोगटे सर्कलकडून गोवावेसकडे जाताना चढाव असल्यामुळे वाहने सावकाश जातात. त्यामुळे या बाजूला जरी वळण असले, तरी ते फारसे टोकदार नाही, शिवाय चढावामुळे अपघात घडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तिकडून इकडे वाहने येताना मात्र काहीशा टोकदार वळणाचा मोठा धोका उद्भवत आहे.

उड्डाणपूल अंधारात

जितका झगमगाट करून या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले, त्यानंतर अनेक कारणांनी तो चर्चेत आला. उड्डाण पुलाच्या कठड्याजवळ भेगा पडल्याने, खालील बाजूला तडे गेल्याने याची बरीच चर्चा झाली. आता तर तो पूर्णपणे अंधारात आहे.  एकदोन छोटे बल्ब सोडले, तर पुलावरील हायमास्ट सध्या बंद अवस्थेत आहेत. 

पदपथाचा अंदाज महत्वाचा

रात्रीच्या वेळी जर वाहनधारक गोवावेस सर्कलकडून गोगटे सर्कलकडे येत असेल, नेमके त्याचवेळी विरूद्ध दिशेने एखादे वाहन जात असेल, तर त्याचा प्रकाशझोत डोळे दिपवतो. अशावेळी बाजूचा हा वळणदार पदपथ लक्षात येत नाही व त्याला वाहन धडकून अपघात होऊ शकतो. त्यामुळे या पदपथाचा अंदाज घेत वाहन चालविण्याची आवश्यकता आहे.