Mon, Sep 28, 2020 07:38होमपेज › Belgaon › आघाडी सरकार पाडण्यासाठी ‘मास्टरप्लॅन’!

आघाडी सरकार पाडण्यासाठी ‘मास्टरप्लॅन’!

Published On: Jun 23 2019 1:13AM | Last Updated: Jun 23 2019 1:13AM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रातून हालचाली सुरू झाल्या आहे. इतके दिवस ‘ऑपरेशन कमळ’ला नकार देणार्‍या वरिष्ठांनी आता हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार फोडून सरकार बनवणे किंवा महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबर कर्नाटकात निवडणूक लावण्याचा ‘मास्टरप्लॅन’ भाजपने आखल्याचे समजते.

आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेपासून काँग्रेसमध्ये नाराजीनामा सुरू झाला असून दीड वर्ष होत आले तरी अनेक वरिष्ठांसह इतर आमदारांचा रोष कमी झाला नाही. त्यातच आता माजी पंतप्रधान आणि निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्‍त केली आहे. त्यामुळे अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यास नकार दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोराचा फटका बसला असल्यामुळे आणि काँग्रेसमधील काही आमदारांनी पुन्हा बंडाचा झेंडा फडकवला असल्यामुळे ऑपरेशन कमळच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे भाजप वरिष्ठांनी आता ऑपरेशन कमळला ग्रीन सिग्‍नल दिला आहे.

सरकारचे पतन करताना माजी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारचे समन्वयक सिद्धरामय्या यांना व्हिलन करण्याचा डाव भाजपने आखला आहे. निजदसोबत आघाडी केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाल्याचे सिद्धरामय्या यांनी पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून सांगितले आहे. त्यात देवेगौडा यांनी आम्ही आघाडी करण्यास इच्छुक नव्हतो. आता मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असे जाहीर वक्‍तव्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे खापर सिद्धरामय्या यांच्यावर फुटेल, अशी रणनीती भाजपकडून आखण्यात येत आहे.

वर्ष अखेर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेसला कर्नाटकातून मदत होऊ शकते. ती मदतही तोडून काँग्रेसला हतबल करण्याचा डाव आखण्यात येत आहे. सध्या ऑपरेशन कमळ राबवून सरकार स्थापन करणे किंवा तीन राज्यांबरोबरच कर्नाटकात मध्यावधी निवडणूक लावण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारत ‘काँग्रेसमुक्‍त’चा भाजपचा ‘प्लॅन’

कर्नाटकात सरकारचे पतन झाल्यास संपूर्ण दक्षिण भारतात काँग्रेसला सत्तेपासून दूर जावे लागणार आहे. त्यामुळे मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असून भाजपने दक्षिण भारत काँग्रेसमुक्‍त करण्याचा प्लॅन आखल्याचे समजते.