बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले मराठा विकास महामंडळ मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. तो सर्व मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे; पण याविरोधात बंदची हाक देणे योग्य नाही. लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत. तरीही अनावश्यक कर्नाटक बंद पुकारल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिला. ते शनिवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.
मराठा विकास महामंडळाला काही कन्नड संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी 5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. मराठा विकास महामंडळचा प्रस्ताव मागे घेण्यास सरकारला 30 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. मी कन्नड आणि कन्नडिगांसाठी आहे. त्यांच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते करण्यास मी तयार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्रतिकृती जाळणे, असभ्य वर्तन करणे यासारख्या गोष्टी मी पाहत आहे. अशा गोष्टी सुरूच राहिल्यास आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही, परंतु त्याला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नांना सरकार सहन करणार नाही. आमचे सरकार प्रामाणिकपणे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आम्ही भेदभाव करीत नाही. त्यांनी हे समजून घ्यावे आणि बंदचा आदेश मागे घ्यावा, असे येडियुरप्पा म्हणाले.