Sat, Aug 08, 2020 14:43होमपेज › Belgaon › आघाडीतील नेत्यांनीही गमावला आत्मविश्‍वास

आघाडीतील नेत्यांनीही गमावला आत्मविश्‍वास

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 13 2019 12:14AM
बंगळूर : प्रतिनिधी

शुक्रवारी विधानसौध परिसर पोलिस, राजकीय नेत्यांनी गजबजला होता. परिसरात केवळ एकच चर्चा होती, ‘सरकार टिकणार की कोसळणार?’ राजकीय गोटात झालेली चर्चा आणि काही घडामोडींची ही 
झलक.मुख्यमंत्रीही अवाक् अनेक आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामागे भाजपकडून दाखवण्यात आलेले आमिष हेच कारण आहे. मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात आल्याने प्रभावी नेत्यांनी राजीनामा दिल्याचे मत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निकटवर्तीयांकडे व्यक्त केले आहे. पक्ष सोडून न जाणारे आमदारही आज पैशांना भुलले. त्यामुळेच सरकारवर संकट कोसळले आहे. आता पुढे काय करायचे, याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. बंडखोरांशी अनेकदा संपर्क साधला. त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. पण, ते परत येण्याची चिन्हे दिसत नसल्याची व्यथा त्यांनी निकटवर्तीयांकडे मांडल्याचे समजते.

आता काय खरं नाही : गुंडुराव

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, कार्याध्यक्ष ईश्‍वर खंड्रे यांनी आपापसात चर्चा करताना आघाडी सरकार वाचवणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले. पक्षीय बलाबलाची चाचपणी त्यांनी केली. आघाडीतील तब्बल सोळा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी गेल्या शनिवारपासून प्रयत्न सुरु आहेत. पण, यश मिळालेले नाही. अपात्रतेचा इशारा दिला तरी त्यांनी जुमानले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्याचा पर्याय निवडला खरा, पण आवश्यक संख्याबळ कसे मिळणार? अशी चर्चा गुंडुराव व खंड्रे यांच्यात रंगल्याचे समजते. यावेळी त्याच ठिकाणी असणारे आ. सी. एम. इब्राहिम यांनीही चर्चेत भाग घेऊन सर्वकाही खरे असल्याचे सांगितले. सरकार कोसळणार हे निश्‍चित आहे. आता आणखी किती काय प्रयत्न करायचे, असे ते म्हणाले.

चला रिसॉर्टकडे : श्रवण

अधिवेशन कामकाज सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर भाजप व निजद आमदार रिसॉर्टच्या दिशेने निघाले. भाजप नेते आर. अशोक, आ. एम. पी. रेणुकाचार्य व अन्य काहीजण विधानसौधच्या परिसरात गप्पा मारत उभे होते. त्यावेळी विधान परिषदेतील निजद सदस्य श्रवण तेथून जात होते. त्यांनी ‘चला निघुया रिसॉर्ट’कडे म्हणून भाजप आमदारांना बोलावले. त्यांच्या या आवाहनाला तेवढ्याच विनोदाने प्रत्युत्तर देताना आर. अशोक यांनी ‘तुम्ही व्हा पुढे आम्ही आलोच’ असे सांगितले. आघाडी सरकार कायम राहणार असून आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा श्रवण यांनी केला. भाजप आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर ते तेथून निघून गेले.

 आघाडीला पाठिंबा कायम

काँग्रेस-निजद आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेतलेला नाही. तो कायम राहणार आहे. बहुजन समाज पक्षाचा आमदार असल्याने वेगळ्या आसनाची मागणी सभापतींकडे केल्याचे स्पष्टीकरण एन. महेश यांनी दिले. शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. मागणीनुसार आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगळ्या आसनाची मागणी केल्यानंतर अनेकांनी पाठिंबा काढून घेतल्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. अनेकांनी आपल्याकडे विचारणा केली होती. वेगळा पक्ष असल्याने वेगळे आसन मागितले, यामध्ये चूक काय? असा प्रश्‍न एन. महेश यांनी केला.