Mon, Sep 28, 2020 08:29होमपेज › Belgaon › आज माघार कुणाकुणाची?

आज माघार कुणाकुणाची?

Published On: Apr 08 2019 1:54AM | Last Updated: Apr 07 2019 11:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी  सोमवार हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतरच रिंगणातील उमेदवारांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर मतदान चिन्हांचे वाटप होणार आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 66 उमेदवारांनी 76 अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये 2 उमेदवारांचे चार अर्ज अवैध ठरले. निवडणुकीच्या रिंगणात 64 उमेदवारांचे 72 अर्ज शिल्लक आहेत. माघारीसाठी शनिवारपासून मुदत होती. मात्र, शनिवारी गुढीपाडव्यामुळे कोणी माघार घेण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे गेलेच नाही. तर रविवारीही अर्ज मागे घेण्यासाठी कोणी गेले नव्हते. त्यामुळे सोमवारीच माघार घेतली जाईल. त्याशिवाय ज्या उमेदवारांनी एकापक्षा जास्त अर्ज भरले आहेत, तेही उद्या जादाचा अर्ज मागे घेतील. 

अर्ज माघारीसाठी सकाळी 11 ते दुपारी तीन ही वेळ आहे.  त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना निवडणुक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. अपक्षांनी एकाच चिन्हाची मागणी केल्यास ज्यांचा अर्ज प्रथम आला आहे त्यांना ते चिन्ह बहाल करण्यात येणार आहे.

दरम्यान, समितीने काही उमेदवारी माघार घेतली, अशी माहिती सोशल मीडियावरून पसरवली जात आहे. मात्र समितीचे उमेदवार माघार घेणार नाहीत, असे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वाधिक अर्ज बेळगावातून

यंदाची लोकसभा निवडणूक कर्नाटकासाठी तसेच बेळगावसाठीही महत्त्वाची ठरणार आहे. कारण यंदा बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राज्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 72 अर्ज असून, त्यामध्ये 47 उमेदवारी अर्ज म. ए. समितीचेच आहेत. त्यामुळे बेळगावकडे राज्य निवडणूक अधिकार्‍यांसह सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

दोन बंडखोर नेते काँग्रेसमधून निलंबित

बंगळूर : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी दोघा नेत्यांना प्रदेश काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. अमृत शेणॉय आणि शानुल हक बुखारी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. काँग्रेस-निजद आघाडीचे उमेदवार प्रमोद मध्वराज निजदच्या चिन्हाद्वारे उडपी-चिक्कमगळुरातून रिंगणात आहेत. पण, अमृत शेणॉय यांनी त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या चिन्हाखाली उमेदवारी दाखल केली. त्याचप्रमाणे बीदरमधून काँग्रेसतर्फे ईश्‍वर खंड्रे काँग्रेस-निजदचे उमेदवार आहेत. पण, शानुल बुखारी यांनी बंडखोरी केली. त्यांनी  खंड्रे यांना आव्हान दिले.

14 मतदारसंघांसाठी 282 उमेदवारी अर्ज

बंगळूर : दुसर्‍या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होत असून 14 मतदारसंघांसाठी 282 अर्ज आहेत. सोमवारी त्यातील किती अर्ज माघारी घेतले जातात यावरून अंतिम आकडा ठरेल. एकूण उमेदवारांपैकी 171 अपक्ष आणि 39 उमेदवार राष्ट्रीय पक्षांचे आहेत.