Thu, Oct 01, 2020 16:59होमपेज › Belgaon › येडियुराप्पा सरकार तरणार की जाणार? आज फैसला

येडियुराप्पा सरकार तरणार की जाणार? आज फैसला

Last Updated: Dec 09 2019 9:32AM

बी. एस. येडियुराप्पाबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

गेल्या 5 डिसेंबरला 15 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होत आहे. पोटनिवडणुकीत 67.91 टक्के मतदान झाले होते. एकूण 15 जागांपैकी किमान आठ जागा भाजपला मिळाल्यास बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी कायम राहतील; अन्यथा सरकारवर गंडांतर येणार हे निश्‍चित आहे.

दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड आणि अथणी या तीन मतदारसंघांसाठी मतदान झाले होती. तिन्ही मतदारसंघांची मतमोजणी सोमवारी आरपीडी महाविद्यालयातील केंद्रात होणार आहे. रमेश आणि लखन जारहीकोळी या दोन भावांमधून गोकाकमध्ये कोण जिंकणार हे उद्या कळेल. तर, कागवाडमधून श्रीमंत पाटील यांनाच पुन्हा मतांची श्रीमंती मिळणार की गेल्यावेळी पराभूत झालेले राजू कागे बाजी मारणार, हेही स्पष्ट होईल. तर महेश कुमठळ्ळी आणि गजाजन मंगसुळी यांच्यात वैयक्‍तिक प्रतिमा की पक्षप्रतिमा सरस ठरेल हेही कळेल. कुमारस्वामी सरकारचा पाडाव होण्याची सुरुवात बेळगाव जिल्ह्यातूनच झाल्यामुळे बेळगावातील तिन्ही निकालांबाबत राज्यभरात उत्सुकता आहे. 

दरम्यान, होसकोटे मतदारसंघात सर्वाधिक 90.90 टक्के आणि के. आर. पुरम येथे सर्वात कमी 46.74 टक्के मतदान झाले होते. नियोजित केंद्रांत मतमोजणी केली जाणार आहे. पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 15 उमेदवार रिंगणात उतरले होते. तर निजदने केवळ 12 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली. अपक्ष उमेदवारांसह एकूण 165 उमेदवार रिंगणात होते. 

भाजपने 13 जागा जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. तर काँग्रेसने किमान 12 जागा मिळतील असे सांगितले आहे. निजदला 5 जागांची अपेक्षा आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात असताना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी या दोन्ही पक्षांतील सतरा आमदारांना तत्कालिन सभापतींनी अपात्र ठरवले होते. यापैकी 15 मतदारसंघांत पान 4 वर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या रागातून काँग्रेस आणि निजद नेत्यांनी आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. कोणत्याही कारणास्तव अपात्र आमदारांना विजय मिळवू द्यायचा नाही, असे दोन्ही पक्षांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी प्रचारकाळात मतयाचना केली. आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपने कोणत्याही कारणास्तव अपात्र आमदारांना पराभूत व्हावयास देणार नाही, असे ठरवले होते. 

त्यांच्यामुळेच सत्ता मिळाल्याचे भाजप नेत्यांनी प्रचारादरम्यान सांगितले. त्यामुळे राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपकडे सर्वाधिक 104 जागा आहेत. 17 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेस 66, निजद 35 आणि इतर 1 असे संख्याबळ झाले. एकूण 17 अपात्र आमदारांपैकी 15 जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या 222 जागा भरल्या जातील. त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 112 जागांची गरज असेल.

सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोनवेळा प्रचार दौरा केला. मतदारांचा भाजपवर विश्‍वास आहे. त्यामुळे किमान 13 जागा भाजप जिंकेल. काँग्रेस आणि निजदला प्रत्येकी एक जागा मिळेल.
बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री

 "