Sat, Aug 08, 2020 14:25होमपेज › Belgaon › राज्यात द्वितीय क्रमांकाचा आदर्श ग्राम पुरस्कार; खा. प्रभाकर कोरेंचे दत्तक गाव

जनवाडच्या शिरपेचात मानाचा तुरा

Published On: Jun 10 2019 1:31AM | Last Updated: Jun 10 2019 12:21AM
कारदगा : प्रशांत कांबळे

जनवाड हे गाव खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेऊन गावाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. गावाला राज्यात आदर्श गावाचा दर्जा मिळून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विकासकामांसह पर्यावरण व सामाजिक बांधिलकीची कास धरून संपूर्ण गाव योजनेत सहभागी  झाल्याने यश मिळाले आहे. सर्वेक्षणात जनवाड गाव संसद आदर्श ग्राम योजनेतील सर्वांगीणदृष्ट्या विकासाचे राज्यात द्वितीय क्रमांकाचे गाव ठरले आहे. महादेव स्वामींच्या  पदस्पर्शाने पावन झालेले जनवाड  गाव प्रसिध्द आहे.

विकास होण्याच्या उदात्त हेतूने खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी प्रधानमंत्री सांसद आदर्श निर्माण ग्राम योजनेसाठी जनवाडची निवड करून विकासकामांसाठी 1कोटी 25 लाख  रुपयांचा निधी मंजूर केला. नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, रिंगरोड, गटारींची निर्मिती, सार्वजनिक शौचालय व अंगणवाडी बांधकामासाठी निधी खर्च केला.

ग्रामपंचायतीच्या उद्योग खात्री व 14 व्या वित्त आयोगातून 1 कोटींवर विकासकामे राबविली आहेत. गावातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून पाणी पुन: वापरण्याचा प्रकल्प व अत्याधुनिक  ग्रंथालयाचे बांधकाम सुरु होत आहे.  ग्रामपंचायतीने अनेक समाजप्रबोधन उपक्रम राबविले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबविला. त्यासाठी तरुण मंडळे व नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले.

प्रदूषण नियंत्रण, तरुण मंडळाच्या पुढाकाराने मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून स्वच्छताही केली. तरुण पिढीला व्यसनापासून दूर करण्यासाठी कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य शिबिरे,  महिला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शेतकर्‍यांना मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. या सर्व कार्याचा आढावा घेत राज्य सरकारने जनवाडला संसद आदर्श ग्रामचे नामांकन मिळाले आहे. जनवाड गाव आदर्श ग्राम ठरल्याने जनवाडसह परिसरातून कौतूक होत आहे.

जनवाड गावाला संसद आदर्श ग्राम योजनेसाठी द्वितीय क्रमांकाचे नामांकन मिळाले असल्याने गावासाठीच नव्हे तर गावातील सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. जनवाड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये अनेक विकासकामे राबविली आहेत. आपले गाव समस्यामुक्‍त बनवण्यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रयत्नशील आहोत.- मेघा पुजारी, ग्रा. पं. अध्यक्षा

जनवाड गावाने नेहमीच वेगळेपण जपले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य नेहमीच धडपडत असतात. गावातील सर्वांच्या सहकार्याने गाव सुंदर बनले आहे. संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये जनवाड गावाला मिळालेले नामांकन म्हणजे आमच्या गावाचा विजय आहे.- सोनाली मगदूम, ग्रा. पं. उपाध्यक्षा

खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी संसद आदर्श ग्राम योजनेतून जनवाड गाव दत्तक घेतले. गावातील पाणी, रस्ते, गटारी, शौचालय बांधकामास प्रोत्साहन दिले. त्यासाठी ग्रामपंचायत, सरकारी अधिकारी, आमचे मार्गदर्शक रामगोंडा पाटील या सर्वांचे सहकार्य लाभले. अनेक समाजशील उपक्रम राबवण्यात युवक मंडळे व नागरिकांचे योगदान मोठे आहे.-डॉ. रमेश चौगुले, ग्रा. पं. सदस्य

जनवाड गाव संसद आदर्श ग्राम योजनेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करण्यापर्यंत मजली मारल्याने गावासाठी अभिमानास्पद आहे. गावात राबविलेल्या विविध विकासकामांसह अनेक समाजशील उपक्रम राबविण्यात ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले. क्षारपड जमीन सुधारणा  करण्यासाठी काम सुरू आहे.-    उदय पाटील, ग्रा. पं. सदस्य