Sat, Aug 15, 2020 14:01होमपेज › Belgaon › खानापुरात वाळू माफीया सक्रिय, वनसंपदेला धोका

खानापुरात वाळू माफीया सक्रिय, वनसंपदेला धोका

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 10:44PMखानापूर : राजू कुंभार

तालुक्यात वाळू उपसा करण्यावर कडक निर्बंध आणल्यानंतर वाळूमाफिया परागंदा झाले. कांही काळ नदी-नाले शुध्द पाण्याने वाहू लागले. मात्र पुन्हा तालुक्यात वाळूमाफिया सक्रिय झाले असून, नदी-नाले धोक्यात आले आहेत. जैवविविधतेलाही धोका निर्माणा झाला आहे.नंदगड, मणतुर्गा, यडोगा, चापगाव, कापोली, नागरगाळी, बिडी, हिरेमुन्नवळी, बेकवाड, हत्तरगुंजी, इदलहोंड, गणेबैल, अंकले, निट्टूर आदी भागात मोठ्याप्रमाणात  वाळू उपसा सुरू आहे. या भागात असलेला नदी-नाल्यातील पाणीसाठ्याला डिझेलचा वास येत असून पाणी गढूळ झाले असल्याच्या तक्रारी नागरीकातून होत आहेत.नदीपात्रात पोकलँड, जेसीबी आणि बोटी उतरवून  वाळू माफियांनी रात्रंदिवस वाळूउपसा सुरू ठेवला आहे. त्यामुळे दुर्मिळ जातीचे जलचर, वनस्पती,  नदीचे सौंदर्य आदी धोक्यात आले आहे. 

खानापूर हा सर्वात अधिक पावसाचा तालुका म्हणून जिल्यात ओळख असली तरी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नदी-नाले पोखरण्यात आल्याने ही परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. वाळू ही पात्रात पाणी धरुण ठेवण्याचे नैसर्गिक साधन असते. पण वाळूच नसल्याने पाणी आता भराभर वाहून जाते.कांही काळ अवैध उपशावर कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने  मोहीम सुरू केली होत. पण माफियांवर आवर घालण्याचे  धाडस अधिकार्‍यांना गेल्या पाच वर्षात झालेले नाही. अद्यापही कारवाई करण्यासाठी  अधिकारी  वा लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे माफियांची दहशत वाढली  आहे 

कायद्याची पळवाट, खोटी समस्या....

माफियांनी कायद्याआडून शासनालाच आव्हान दिले आहेे. गरजूंना वाळू हवी, सरकारला महसूल हवा, यंत्रणेला हप्ता हवा, राजकीय नेत्यांना कार्यकर्ते पोसायला हवेत, असे माफिया सांगतात.  मात्र त्यामुळे परवानाधारक वाळू व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माफियांनी मात्र  नदी-नाल्यांमध्ये जेसीबी  उतरवल्या आहेत. पोेलीसांच्या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रक जेसीबी ताब्यात घेवून लाख रुपयांचा दंड ठोठावला तरी हे माफिया हसत हसत पैसे भरुन जातातत.मग वाळूतून मिळणारा पैसा किती मोठ्याप्रमाणात येतो हे लक्षात येते. 

कायदेशीर कारवाई हवी...

सध्याा नदी-नाले पोखरण्याचे काम सुरू असून माफीयांनी  तालुक्यात तळ ठोकला आहे. वाळूतस्करी आणि साठेबाजी यावर दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार कडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.