Tue, Mar 02, 2021 09:59
शेकडो वाहने कोगनोळी नाक्यावरून महाराष्ट्रात परत

Last Updated: Feb 24 2021 2:30AM

कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी सकाळपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रावर महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनधारकांची कसून तपासणी सुरू आहे. मंगळवारी तपासणी अधिक कडक करण्यात आली. त्यामुळे दिवसभरात शेकडो वाहनांना नाक्यावरून परत महाराष्ट्रात जावे लागले.  

सोमवारपेक्षा मंगळवारी प्रवासी वाहनांची वर्दळ कमी जाणवत होती. सकाळी 10  वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसनाही रोखून धरण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची धांदल उडाली.

कर्नाटकातून महाराष्ट्रात शेकडो विद्यार्थी शिकण्यासाठी दररोज ये-जा करतात. तपासणी केंद्रावर आरोग्य विभाग व पोलिस कर्मचार्‍यांकडून तपासणी केली जात आहे. कागल आगाराचे विजय खोत व सहकार्‍यांनी प्रत्यक्ष तपासणी केंद्राला भेट देऊन विद्यार्थी व प्रवाशांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल माहिती दिली. त्याबाबत आवश्यक माहिती पुरवल्यानंतर व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बसेसना कर्नाटकात सोडण्यात आले. महाराष्ट्रातून येणार्‍या सदर बसेसना ‘लोकल बस’ असा उल्लेख करून प्रवेश दिला जात होता.

दिवसभरामध्ये महाराष्ट्रातून कर्नाटकात अनेक कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, अवजड वाहने, दुचाकी वाहने ये-जा करीत होती. तपासणी केंद्रावर महसूल विभागाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर तळ ठोकून होते. अनेक प्रवाशांनी आपल्यासोबत 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्रही ठेवल्याचे दिसून येत होते. प्रमाणपत्र सादर करणार्‍या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश देण्यात आला.