Mon, Sep 28, 2020 07:51होमपेज › Belgaon › उद्या शंभरावर सरकारी अधिकारी, कर्मचारी निवृत्त !

उद्या शंभरावर सरकारी अधिकारी, कर्मचारी निवृत्त !

Published On: May 30 2019 1:32AM | Last Updated: May 30 2019 1:32AM
बेळगाव : अंजर अथणीकर 

प्रत्येकाची निवृत्तीची तारीख ही ते रुजू झालेल्या तारखेपासून 60 वर्षांपर्यंत गृहीत धरली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या तारखांना निवृत्ती होत असते. परंतु, वर्षातून एक तारीख अशी येते की, त्या दिवशी निवृत्तधारकांची संख्या अधिक असते. तो दिवस म्हणजे 31 मे. याचे कारणही तितकेच गंमतीशीर आहे. कारण, पूर्वीच्या काळी शाळा प्रवेशावेळी ज्यांची जन्मतारीख सरसकट 1 जून हीच नोंदविली गेली आहे, त्यांची निवृत्ती 31 मे रोजीच होते. यंदा जिल्ह्यातून असे 1 जून हा बर्थडे असणारे 100 हून अधिक सरकारी अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. 

पोलिस खात्याचा विचार करता निवडणुकीपूर्वी बदली होऊन गेलेले पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा यांच्यासह एक पोलिस उपनिरीक्षक आणि 18 कर्मचारी 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहा कर्मचार्‍यांचा, तर महापालिकेतील आर. व्ही. कवीगार, सतीश कांबळे या दोन लिपिकांसह  सात सफाई आणि इतर कामगार सेवानिवृत्त होणार आहेत. बेळगाव तहसील कार्यालयातील एक कर्मचारी निवृत्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कार्यकारी अभियंत्यासह तीन कर्मचारी निवृत्त होत आहेत. जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित जिल्हाभरात विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले 25 कर्मचारी निवृत्त होत आहेत. जवळपास जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील शंभरहून अधिक कर्मचारी शुक्रवारी निवृत्त होणार आहेत.

अणखी अठरा वर्षे हाच दिवस

ज्यांनी 40 ओलांडली आहे, अशा सर्वच व्यक्तींची शाळेतील जन्म तारीख ही तेव्हा 1 जून हीच नोंदविलेली आहे. त्यामुळे आगामी किमान 15 ते 18 वर्षे तरी सर्वाधिक निवृत्त होणार्‍यांची संख्या ही 31 मे हीच असणार आहे. तसे पाहिल्यास हा अप्रत्यक्ष हा रिटायर डेच म्हणावा लागेल.  इतक्या प्रमाणात निवृत्ती झाल्यानंतर ती पदे तात्काळ भरली जावीत, ही अपेक्षा असते. परंतु, तसे होत नसल्यामुळे याचा ताण इतर कर्मचार्‍यावर पडत आहे. 

शाळा प्रवेशाची पद्धतही अफलातून 

पूर्वीचे पालक आपल्या मुलांची जन्मतारीख सहसा लिहून ठेवत नसत.  जेव्हा शाळेसाठी विद्यार्थी शोधत शिक्षक एखाद्याच्या घरी जायचे तेव्हा मुलाला शाळेत घालण्यासाठी सहा वर्षे पूर्ण हवीत, याचा विचार करायचे. जन्मतारीखच माहिती नसल्यामुळे त्याला सहा वर्षे पूर्ण आहेत की नाही, हे कळणार कसे? त्यावर तत्कालीन शिक्षक अफलातून प्रयोग राबवयाचे. ज्याचे वय सहाच्या दरम्यान वाटते, त्याला उजवा हात डोकीवरून  घेऊन डावा कान पकडायला लावायचे. जर त्या मुलाचे मधले बोट कानाला लागले, तर सहा वर्षे पूणर्र् अन्यथा अद्याप वय  बसत नाही, असा त्याचा अर्थ. विशेष म्हणजे ज्याला सहा वर्षे पूर्ण होतात, त्याचेच बोट कानाला लागते, यामध्ये आजही तथ्य आहे.