Mon, Apr 12, 2021 02:26
फर्निचर मेकर्सचा २४ लाखांवर डल्‍ला

Last Updated: Apr 08 2021 2:03AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

फर्निचरचे काम करताना झालेल्या ओळखीचा फायदा उठवत घर व लॉकरच्या बनावट चाव्या बनवल्या. घर बंद असताना घुसून तब्बल 24 लाखांचे सोने व रोकड पळवून नेली. चार दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले.  महंमदसुल्तान नसीरअहंमद अन्सारी (22, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. होनगा) असे संशयिताचे नाव आहे. उत्तर प्रदेशचा असणारा महंमदसुल्तान फर्निचरचे काम करतो. संगमेश्‍वरनगर येथील जाफरीयाबानू यांच्या घरातील फर्निचरचे काम त्याने केले होते. त्यामुळे या घरात त्याचे येणे-जाणे होते. 

ओळखीचा फायदा उठवला 

तीन महिन्यांपूर्वी त्याने जाफरीयाबानू यांचा मुलगा घरात एकटाच असताना गेला. यावेळी त्याने घराच्या कुलुपाचे, तिजोरीतील लॉकरच्या चावीचे शिक्के त्या मुलाच्या नकळत साबणावर उमटवून घेतले. कारण, या घरात सोन्याचे दागिने तसेच घराणे श्रीमंत असल्याचे त्याने हेरले होते. 

संधीच्या शोधात 

यानंतर महंमदसुल्तान हा संधीच्या शोधात होता. जाफरीयाबानू या 2 एप्रिल रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी दरवाजा बंद करून गेल्या. जाताना त्यांनीही समोरील दरवाजाला आतून कडी लावत पाठीमागील दरवाजाला कुलूप लावले. परंतु, या घराची इत्यंभूत माहिती असलेल्या महंमदसुल्तानने ही संधी साधली. बनावट चावीने त्याने पाठिमागील बाजूने घरात प्रवेश केला. त्यानंतर बनावट चावीने लॉकर उघडून त्यातील तब्बल 47 तोळ्यांचे दागिने व लाखाची रक्कम त्याने लांबवली. जाताना त्याने पूर्वीसारखेच कुलूप लावून निघून गेला. 

शॉर्टकट श्रीमंती नडली

फर्निचरचे काम करताना महंमदसुल्तानला शॉर्टकट श्रीमंत होण्याची हाव नडली. त्यामुळे या चोरीची तो तब्बल 3 महिन्यांपासून तयारी करीत होता. इतके सर्व काही नियोजनबद्ध केले असल्याने याचा सहसा कोणाला संशयही येण्यासारखे नव्हते. परंतु, पोलिसांनी याचा नेमका शोध लावत चोरट्याला जेरबंद केले. 

वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी मुत्तूराज व गुन्हे विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे निरीक्षक दिलीपकुमार के. एच., उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी सहायक उपनिरीक्षक बी. के. मीटगार, दिपक सागर, शंकर कुगटोळी, नामदेव लमाणी, केंपान्ना दोड्डमनी, रमेश अक्की महादेव कुंभार व यांनी ही कारवाई केली. 

आधी 15 लाख, आता 24 लाख 

चोरी झाली की त्यावेळी पोलिसांकडून त्या सोन्याची किंमत कमी लावून कमीतकमी रक्कम दाखवण्याचा अट्टहास असतो. 47 तोळे सोने चोरीला गेल्यानंतर तेव्हा पोलिसांनी याची किंमत 15 लाख नोंदवली होती. परंतु, ते पूर्ण सोने मिळाल्यानंतर मात्र आज त्याची किंमत 24 लाख रू. इतकी सांगितली.