Sat, Aug 15, 2020 12:53होमपेज › Belgaon › चार वर्ग, 80 विद्यार्थी, एकच खोली..!

चार वर्ग, 80 विद्यार्थी, एकच खोली..!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:52PMखानापूर : वासुदेव चौगुले

बहुप्रतीक्षेने मंजूर झालेल्या खानापुरातील सरकारी आयटीआय कॉलेजच्या अडचणींची मालिका अद्यापही संपली नाही. चार वर्ग, 80 विद्यार्थी, कार्यालय, क्‍लासरुम, आणि प्रयोगशाळा सर्वकाही एकाच खोलीत चालवावे लागत असल्याने अध्यापनावर परिणाम होत आहे. कॉलेजसाठी  5 एकर जागा मंजूर झाली असतानाही तीन वर्षापासून इमारत उभारणीच्या कामास दिरंगाई होत आहे.

2014 साली तालुक्यात पहिले सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालय मंजूर झाले. कालांतराने जागा, इमारत, सामग्री व आवश्यक साधनांची पूर्तता केली जाईल. या आशेने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ लागले. येथील शिक्षणाचा दर्जाही चांगला असल्याने गुणवत्तेनुसार प्रवेश घेताना कौन्सिलिंगमध्ये बेळगावचे विद्यार्थीही प्रशिक्षणासाठी खानापूर कॉलेजची निवड करतात. असे असताना कॉलेजला हक्काचे छत मिळाले नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सन 2014 साली आयटीआय कॉलेजसाठी हत्तरगुंजीजवळील स. नं. 24 मध्ये 5 एकर जागाही मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर पायाभूत इमारत उभारणीच्या कामासाठी 1 कोटी 40 लाखाचे अनुदानाही मंजूर झाले आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण होऊन कंत्राटदाराचीही निश्‍चिती झाली आहे. मात्र, सदर जागेची केजेपी होऊन कॉलेजच्यानावे स्वतंत्र उतारा तयार झाल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही. परिणामी महसूल विभाग व सर्व्हे विभागाकडे प्राचार्यांनी अनेकदा खेटा मारुनही आवश्यक जागेचे सर्वेक्षण करुन नकाशा व स्वतंत्र उतारा करुन देण्यात आला नसल्याने पुढील काम ठप्प झाले आहे.

कॉलेजच्या उभारणीसाठी निश्‍चित करण्यात आलेली जागा महामार्गाला लागून असली तरी त्याठिकाणी झाडेझुडुपे वाढली आहेत. खड्डेही पडले असल्याने जागेचे सपाटीकरण झाल्याशिवाय सर्वे करता येत नसल्याचे सांगितल्याने प्राचार्य व शिक्षकांनी स्वत: पैसे खर्चून जेसीबीद्वारे संपूर्ण जागा स्वच्छ व सपाट करुन घेतली आहे. त्यानंतरही नकाशाप्रमाणे जागा आयटीआय कॉलेज प्रशासनाच्या ताब्यात देण्यास दिरंगाई सुरु असल्याने अजून किती वर्षे भाडोत्री खोलीचा आधार घ्यावा, असा सवाल विध्यार्थी विचारत आहेत. सध्या सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या एका खोलीमध्ये आयटीआय कॉलेज सुरु आहे. नूतन इमारतीची उभारणी होईपर्यंत सरकारी हायस्कूलमधील दोन खोल्या कॉलेजसाठी देण्याची मागणी प्राचार्य आर. जी. पट्टनशेट्टी यांनी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे केली आहे.