Mon, Aug 10, 2020 21:34होमपेज › Belgaon › धक्‍कादायक : जिल्ह्यात दिवसात 5 बळी

धक्‍कादायक : जिल्ह्यात दिवसात 5 बळी

Last Updated: Jul 11 2020 1:23AM

बेळगाव : हिंदवाडी येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे बॅरिकेडस् लावून अडवण्यात आलेला रस्ता.बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनीतील महिलेचा, तसेच हुक्केरी शहरातील चिकनविक्रेत्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरी धक्‍कादायक बाब म्हणजे बिम्समधील आणखी एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासह जिल्ह्यात 16 जण शुक्रवारी पॉझिटिव्ह ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 466 वर पोहोचली आहे, तर मृत्यूसंख्या 12 झाली आहे. 

बेळगाव शहरात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. याआधी शास्त्रीनगर येथील वृद्धाचा बळी गेला होता. त्यानंतर आता वंटमुरी कॉलनी येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातही कोरोना धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. वंटमुरी कॉलनी येथील  महिला गुरुवारी रुग्णालयात दाखल झाली होती. शुक्रवारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

हुक्केरी आणि अथणी येथील प्रत्येकी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हुक्केरी शहरात आढळलेल्या 58 वर्षीय महिलेचा चिकन विक्रीचा व्यवसाय होता. तिला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे तिने आधी संकेश्‍वर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तरी आजार कमी होत नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घशातील द्राव घेऊन प्रयोगशाळेला पाठवले असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

चिकनविक्रेत्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्यामुळे आरोग्य खात्याने तिच्यावर उपचार केलेल्या खासगी डॉक्टरांसह प्राथमिक व दुय्यम संपर्कातील संशयितांना क्‍वारंटाईन केले आहे. तर चिकन घेऊन गेलेल्या खवय्यांत धाकधूक वाढली आहे.

अथणी येथील एका महिलेचाही कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे अथणी तालुक्यात बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.  शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेलाही कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय आरोग्य खात्याला आहे; पण अद्याप अहवाल आला नसल्यामुळे महिला संशयित असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. 

दोघांवर बेळगावात अंत्यसंस्कार

सकाळी मृत्यू झालेल्या हुक्केरी आणि अथणी येथील कोरोनाबाधितांवर बेळगावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर संध्याकाळी मृत्यू झालेल्या तिघांबाबत रात्री उशिरापर्यंत आरोग्य खात्याने निर्णय घेतला नव्हता. त्यांचा अहवाल बनवण्याचे काम सुरू होते.

कोरोना योद्धेच पॉझिटिव्ह

गेल्या आठवड्यापासून कोरोना योद्धेच पॉझिटिव्ह येत आहेत.शुक्रवारी बीम्समधील डॉक्टर आणि पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आला असून लोकांत धास्ती वाढली आहे. शहरात एकूण चार जणांना तर जिल्ह्यात 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 466 वर पोचली आहे. बिम्स येथे कोराना कक्षात सेवारत असलेल्या डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली. याआधीही एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली असून एक नर्स व एक एक्स रे तंत्रज्ञही कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे रूग्णालयात भीतीचे वातावरण आहे.

मच्छे येथील केएसआरपी क्‍वार्टरमधील एका पोलिसालाही बाधा झाली. हा पोलिस कर्मचारी कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर सेवा बजावत होता. याआधी तिघा कोरोनांना कोरोनाची बाधा झाली आहे. सदाशिवनगर, हिंदवाडी, खासबाग आणि बसवण कुडची येथील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यळेबैल येथेही कोरोना बाधित सापडला आहे. जिल्ह्यात अथणी येथे 3,  हुक्केरी येथे दोन, रामदूर्ग येथे 1, चिकोडी येथील तिघे, बैलहोंगल येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यात बेळगाव शहरात 23 ठिकाणी कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे सर्व भाग पोलिसांनी बॅरिकेडस लावून बंद केेले आहेत. निर्बंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. अथणी येथे रोज रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

चौघांची मात

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांनी आज कोरोनावर मात केली. बेळगाव तालुक्यातील तिघे आणि हुक्केरी तालुक्यातील एकाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मिरज येथे अथणीच्या दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अथणी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील दोन व्यक्तींचा शुक्रवारी मृत्यू झाला. मिरज येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी करुंदवाड ( जि. कोल्हापूर येथील 3 पुरूष व 1 महिला, अथणी (जि. बेळगाव) येथील 63 वर्षीय पुरूष व 40 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली.