Sat, Aug 15, 2020 13:05होमपेज › Belgaon › २ अपत्यांना वाचवले, तिसर्‍याचा मृत्यू

२ अपत्यांना वाचवले, तिसर्‍याचा मृत्यू

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 26 2019 1:38AM
बेळगाव : प्रतिनिधी

घराला लागलेल्या आगीत आठ वर्षाच्या बालिकेचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास रघुनाथ पेठ अनगोळ येथे ही घटना घडली. कस्तुरी रामू मलतवाडी (रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे मृत बालिकेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे आग लागल्यानंतर आई आपल्या दोन मुलांना घेऊन लगबगीने बाहेर पडली. त्यामुळे ती दोन मुले वाचू शकली. मात्र झोपूनच राहिलेली कस्तुरी आगीत होरपळली.

देव्हार्‍यातील दिव्याची पेटती वात उंदराने घरातील कपड्यावर आणून टाकल्याने घराने पेट घेतल्याचा संशय अग्निशामक दलाने व्यक्त केला. पोलिसांनी मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याची नोंद केली आहे. 

मलतवाडी कुटुंबीय जेवण करून झोपले होते. मेंढपाळ असणारे वडील बकरी घेऊन बाहेर गेलेले असल्याने घरात  आई व तीन मुले होती. रात्री दीडच्या सुमारास दव्यातील पेटती वात उंदराने तोंडात धरून कपड्यांवर आणून टाकली. त्यामुळे आधी कपड्यांनी पेट घेतला त्यानंतर इतर वस्तू पेटल्या. आई व मुले गाढ झोपेत असल्याने त्यांना लवकर कळाले नाही. परंतु, आगीची झळ लागल्यानंतर  महिला घाबरली. तिने तातडीने बाजूला झोपलेला एक मुलगा व दुसर्‍या मुलीला तातडीने उठवले व हाताला धरून घराबाहेर आणले. परंतु भांबावलेल्या स्थितीत घरात आपली आणखी एक मुलगी कस्तुरी तेथेच झोपली आहे याचे भान तिला राहिले नाही. 
अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकार्‍यांनी आग आटोक्यात आणली. घराचे ही जळून मोठे नुकसान झाले आहे.