बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
आमदार उमेश कत्ती यांच्या रूपाने बेळगाव जिल्ह्याला पाचवे मंत्रिपद मिळाले आहे. बुधवारी दुपारी राजभवनात झालेल्या समारंभात कत्ती आणि बागलकोटचे आमदार मुरुगेश निराणी यांच्यासह सात नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अबकारी मंत्री एच. नागेश यांना डच्चू देण्यात आला असून त्यांना आंबेडकर महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. लवकरच नव्या मंत्र्यांना खातेवाटप केले जाणार आहे. कत्तींना पर्यटन खाते मिळण्याची शक्यता आहे.
गतवर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप सरकार अस्तित्वात आले होते. त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेल्या इतर पक्षांतील 17 आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर दोनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण, सहकार्य केलेल्या सर्वांना मंत्रिपद देणे शक्य झाले नाही. आता पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीनंतर सात नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला.
मंत्रिमंडळातील सर्व पदे आता भरली आहेत. अबकारी मंत्री एच. नागेश यांना पदत्यागाची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यास एक पद रिक्त होईल. जातनिहाय विचार करूनच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. सातपैकी दोघे वीरशैव, दोघे अनुसूचित जाती, दोघे धनगर आणि एक आमदार वक्कलिग समाजातील आहेत. मुंबई-कर्नाटक भागातील वीरशैव समाजाचे प्रभावी नेते उमेश कत्ती, कल्याण कर्नाटक भागातील पंचमसाली समाजाचे मुरुगेश निराणी यांना मंत्रिपद मिळाले आहे. अनुसूचित जातीतील एस. अंगार सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद देण्यात आले आहे. याच जातीतील आमदार अरविंद लिंबावळींचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळात आता लिंगायत मंत्र्यांची संख्या 9 वरून 11 वर गेली आहे.
नवे मंत्री असे
उमेश कत्ती, मुरुगेश निराणी, एस. अंगार, अरविंद लिंबावळी, एमटीबी नागराज, सी. पी. योगेश्वर आणि आर. शंकर.
कत्तींना पर्यटन?
नूतन मंत्री कत्ती, निराणी आणि लिंबावळी यांनी वजनदार खात्याची मागणी केली आहे. मात्र कत्तींना पर्यटन, निराणींना ऊर्जा, लिंबावळींना बंगळूर विकास खाते, एमटीबी नागराज यांना मागासवर्ग विकास, आर. शंकर यांना अबकारी, अंगार यांना कन्नड आणि संस्कृती खाते देण्यात येणार आहे.
एप्रिलमध्ये पुन्हा पुनर्रचना
मार्च-एप्रिलदरम्यान पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. मंत्रिपदापासून वंचित असणार्यांना त्यावेळी मंत्रिमंडळात निश्चितपणे स्थान दिले जाईल, असा विश्वास आहे, असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
शहरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौरास्थळाची पाहणी करून ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज 7 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार मुनीरत्न, एच. विश्वनाथ, महेश कुमठळ्ळी इच्छुक असून गुलबर्गा येथील मालिकय्या गुत्तेदार यांना मंत्रिपद मिळणे अपेक्षित आहे. मालिकय्या गुत्तेदार हे माझ्यापेक्षा सक्षम आहेत. नागेश यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार नाही. सरकार सत्तेवर येण्यासाठी अनेकच जणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बसवकल्याण, बेळगाव, मस्की या मतदार संघात पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतर तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.