Sat, Aug 15, 2020 13:49होमपेज › Belgaon › भाजीपाला कचर्‍यापासून खतनिर्मिती 

भाजीपाला कचर्‍यापासून खतनिर्मिती 

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 26 2019 8:17PM
बेळगाव : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) नूतन भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचा सुमारे सोळा टन  कचरा होतो. सदर कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. किणये येथे खत निर्मिती प्रकल्प होणार असून एपीएमसीतर्फे कचर्‍याची उचल करून दिली जाणार आहे. 

एपीएमसीत 14 मेपासून भाजी मार्केट सुरू झाले आहे. सदर भाजी मार्केटमध्ये नियमित रोज 16 टन भाजीपाल्यांचा कचरा तयार होतो. त्या कचर्‍यांची उचल झाली नाही तर परिसरात दुर्गंधी पसरते. त्यासाठी एपीएमसीतर्फे नियमित कचर्‍याची उचल होणे गरजेचे आहे. 

किल्ला भाजी मार्केटमध्ये कचर्‍याची उचल होत नव्हती. तसेच पावसाळ्यात दलदल निर्माण व्हायची. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. तात्पुरती मलमपट्टी म्हणून या ठिकाणी चिपिंग टाकले जात होते. दलदलीचा हमालांना मोठा फटका बसत होता.दलदलीमुळे त्यांची त्वचा खराब होत होती. पण एपीएमसीत सुसज्ज भाजी मार्केट उभारण्यात आले असून रस्ते मोठे आहेत. त्यामुळे दलदल किंवा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. पण येथील कचर्‍याची उचल नियमित होणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याचा पर्याय समोर आला आहे. 

भाजी मार्केटमध्ये  रोज 16 टन कचरा तयार होतो. त्या कचर्‍यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी किणये येथे खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य शेतकरीही  कचर्‍यापासून  खत निर्मितीसाठी इच्छूक असतील तर त्यांनाही संधी दिली जाणार आहे असेही एपीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे. खतनिर्मितीचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

रासायनिक खतांमुळे जमीन खराब

शेतकर्‍यांना दरवर्षी बी-बियाणे, रासायनिक खते आदी गोष्टी विकत घेत असतो. मात्र, रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरल्यामुळे जमीन खराब होत आहे. त्यामुळे उत्पादन कमी होते. त्यासाठी सेंंद्रिय शेती हा पर्याय शेतकर्‍यांसमोर असून जैविक खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारण्याबरोबर उत्पादनातही वाढ होण्यास मदत होते. तसेच सध्या सेंंद्रिय उत्पादनांना बाजारात मागणी वाढली आहे.

एपीएमसीतील कचर्‍याची उचल सुरू आहे. खतनिर्मिती करण्यासाठी कचर्‍याची मागणी आली आहे. आणखी काही शेतकरी खत निर्मिती करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनाही कचरा उचल करून दिला जाणार आहे. -आनंद पाटील, अध्यक्ष एपीएमसी