Sat, Aug 15, 2020 12:29होमपेज › Belgaon › तिसरीचे पुस्तक, बिघडून टाकी मस्तक

तिसरीचे पुस्तक, बिघडून टाकी मस्तक

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 16 2019 10:12PM
बेळगाव : प्रतिनिधी

शिक्षण खात्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात मोफत वितरण केलेल्या पुस्तकामध्ये चुकांचा भडिमार केला आहे.  मराठी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या भाषा पुस्तकात दोनशेहेहून अधिक चुका आहेत. यामध्ये चुकीच्या, अश्‍लिल आणि महापुरुषांचा अवमान करणार्‍या शब्दांचा भरणा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या पालकांना सतावत आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांना नेहमीच प्रशासनाकडून सापत्नभावाची वागणूक देण्यात येते. यातून मराठीचे अडचणीत येत असताना संस्कारक्षम वयातील कोवळ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून चुकीच्या शब्दांचा मारा केला आहे. परिणामी पालकांमध्ये मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे की नाही, असा प्रश्‍न सतावत आहे.

चुकांची सुरुवात पहिल्या पानापासून झाली असून याचा कळस अनुक्रमणिकांमध्ये झाला आहे. एकाच पानांवर 80 हून अधिक चुकीचे व अश्‍लिल शब्द छापले आहेत.

सुभाषचंद्र बोस यांचा अवमान

पुस्तकातील पान क्र.  5 वर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्यावर धडा आहे. यामध्ये पराक्रमी पुत्राचा जन्मदिवस असा उल्लेख असणे आवश्यक आहे. परंतु पुस्तकामध्ये अवमानकारक शब्द वापरला आहे. हा समस्त भारतीयांचा अवमान आहे. यामुळे मराठी भाषिकांबरोबरच देशभक्त संघटनाकडून संताप व्यक्त होत आहे.

चर्चा झाली, कार्यवाही कधी?

पुस्तकांतील चुकाबाबत जि. पं. शिक्षण आणि आरोग्य , सामान्य स्थायी समिती बैठकीत जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी जोरदार आवाज उठविला. यावेळी चिक्कोडी आणि बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

शिक्षण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करून पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरीदेखील केवळ चुकांचा शोध घेण्यात येत आहे. शिक्षण खात्याने पाठ्यपुस्तक मंडळावर कारवाई करण्याबरोबर पुस्तके मागे घेण्याची मागणी होत आहे.

पाठ्यपुस्तक मंडळाचे दुर्लक्ष

पाठ्यपुस्तक तयारी करण्याची जबाबदारी पाठ्यपुस्तक मंडळाची असते. यामध्ये अध्यक्षासह पांच जणांचा सहभाग आहे. चुकीच्या छपाईबद्दल त्यांच्याकडून अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अधिकार्‍यांनी अंधारात ठेऊन छपाई केल्याचा ठपका ठेवला आहे. अधिकारी मनमानी करत असल्यास पाठ्यपुस्तक मंडळाने राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशीही मागणी मराठी भाषिकांतून होत आहे.

मराठी संघटनांची चुप्पी

सीमाभागात मराठी भाषा, संस्कृती, लिपी जोपासना करण्यासाठी कार्यरत असणार्‍या संघटना अनेक आहेत. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. युवा समितीने निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे. म. ए. समिती, मराठी लोकप्रतिनिधी, साहित्य संमेलने, युवक मंडळे  यांनी मौन बाळगले आहे. यामुळे शालेय स्तरावर मराठीची गोची होणार असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुस्तक मागे घेईपर्यंत आंदोलन हाती घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मराठी शाळांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.