Sat, Aug 15, 2020 12:38होमपेज › Belgaon › बँक कर्मचार्‍यांनाही ‘इलेक्शन ड्युटी’

बँक कर्मचार्‍यांनाही ‘इलेक्शन ड्युटी’

Published On: Apr 17 2019 2:03AM | Last Updated: Apr 16 2019 10:39PM
बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभेसाठी पहिल्यांदाच बँक अधिकारी व कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्यूटी देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षक म्हणून ते कार्यरत राहणार आहेत. मंगळवारी राष्ट्रीयकृत बँकेतील 80 टक्के कर्मचार्‍यांना निवडणूकीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. बँकेत व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. 

मारुती गल्ली, कँप येथील सिंडिकेंट बँक, किर्लोस्कर रोडवरील महाराष्ट्र बँक आदी बँकांसमोर ‘कर्मचारी इलेक्शन ड्यूटीला गेले आहेत बँक बंद राहिल’ असे पत्रक लावण्यात आले आहे. मारुती गल्लीतील सिंडिकेट बँकेच्या प्रवेशद्वारावर निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे व्यवहार गुरुवारपासून सुरळीत सुरु राहतील असे पत्रक लावण्यात आले आहे. मंगळवारी अचानक बँक बंद असल्याने अनेक ग्राहक बँकेसमोरील पत्रक पाहूण परत जात होते. बँक कर्मचार्‍यांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. बुधवारी महावीर जयंतीची सुट्टी व बुधवारी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी बँकेतील व्यवहार सुरु राहणार आहेत. अशी माहिती बँक अधिकार्‍यांनी दिली. सध्या लग्‍नसराईचा सीजन सुरु आहे. यामुळे अनेकजण बँकेतून पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र अचानक बँक बंद असल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. अनेक बँकांच्या एटीएममध्येही ठणठणाट होता. यामुळे बँक ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.

बेळगाव लोकसभेसाठी यंदा 57 उमेदवार आहेत. यामुळे प्रत्येक केंद्रावर चार मतदानयंत्र बसवावी लागणार आहेत. यामुळे प्रत्येक केंद्रावर कर्मचारी देखील अधिक लागणार आहेत. यामुळे बँक कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्यूटी दिली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकेतून रोज 1 लाखाच्यावर व्यवहार झालेल्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी लागणार आहे. 10 लाख  रक्कम बँकेतून काढल्यास संबंधीताच्या घरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. 

बँकेतील सुमारे 80 टक्के अधिकारी व कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्यूटी दिली आहे. सुक्ष्म निरिक्षक म्हणून ते कार्यरत राहतील. यामुळे मंगळवारी बँक बंद ठेऊन अंतर्गत कामकाज सुरु होते. -विनायक पाटील, व्यवस्थापक, सिंडिकेंट बंँक