Sat, Aug 15, 2020 12:58होमपेज › Belgaon › पात्र लाभार्थीनाच रेशन अन्नधान्यासाठी ‘इ-केवायसी’

पात्र लाभार्थीनाच रेशन अन्नधान्यासाठी ‘इ-केवायसी’

Published On: May 22 2019 1:36AM | Last Updated: May 21 2019 11:00PM
बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून रेशनकार्डांचे नूतणीकरण झालेले नाही. जुन्याच माहितीच्या आधारे रेशनकार्डधारकांना अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. या योजनेंतर्गत योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा म्हणून आता इ-केवायसीचा (इ-नो युवर कस्टमर) वापर करण्यात येणार आहे.

इ-केवायसीसाठी रेशनकार्डधारकाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. ही व्यवस्था 1 जूनपासून लागू होणार आहे. इ-केवायसीच्या अंमलबजावणीसाठी दोन महिने लागणार आहेत. त्याबरोबरच जात आणि उत्पन्नाचा दाखलाही देण्याची सूचना करण्यात येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी रेशनकार्डाला आधार क्रमांकाचे लिंक देण्यात आले आहे. त्या आधारावर आता रेशन अन्नधान्याचे वितरण होत आहे. पण, मृत व्यक्‍ती, स्थलांतर केलेली व्यक्‍ती, लग्‍न होऊन सासरी गेलेल्या मुलींची नावे तसेच गावामध्ये सध्या राहात नसणार्‍यांची नावे रेशनकार्डातून वगळण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावचे रेशन अन्नधान्य संबंधित कार्डधारकाला मिळत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अंगठ्याचा ठसा जाणार असून जेवढे लोक ठसा देतील, त्यानुसारच अन्नधान्याचे वितरण होणार आहे.

इ-केवायसी प्रक्रिया एकदाच होणार आहे. केवायसी न देणार्‍या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास रेशन अन्नधान्य घेऊन जाता येणार नाही. रेशनकार्डधारकांना केवायसीसाठी जात आणि उत्पन्नाचा दाखला सक्‍तीचा नाही. पण, सॉफ्टवेअरमध्ये याबाबतचे रकाने असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

 वृद्ध, कुष्ठरोगी, दिव्यांग (हाताची बोटे नसणारे), एन्डोसल्फानग्रस्तांना केवायसीतून सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकरणांची पाहणी करुनच रेशनकार्ड अपडेट करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

आतापर्यंत अनेकदा बोगस रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. वेळोवेळी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री किंवा अधिकारी याबाबतची आकडेवारी जाहीर करतात. कार्ड रद्द केलेल्यांकडून पुन्हा नवे कार्ड मिळवले जाते. हे चक्र सुरुच आहे. याविषयी कठोर पाऊल उचलून भ्रष्टाचार रोखण्याची मागणी जनतेतून होत आहे.

रेशनकार्डचा गोंधळ थांबणार कधी?

अनेक वर्षांपासून रेशन अन्नधान्य आणि रेशनकार्डांचा गोंधळ सुरुच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी हा गोंधळ दूर करण्यात यश आलेले नाही. अजूनही हजारो पात्र लाभार्थी रेशन अन्नधान्यापासून वंचित आहेत. काँग्रेस सत्तेवर असताना अन्नधान्याऐवजी संबंधित रेशनकार्डधारकाच्या बँक खात्यात थेट रक्‍कम जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेण्याबाबत पोर्टेबिलिटीचाही विचार करण्यात आला होता. अजूनही याविषयीचा गोंधळ कायम आहे.