Mon, Sep 28, 2020 07:15होमपेज › Belgaon › मिरज-लोंढा मार्गाचे २०२० पर्यंत दुहेरीकरण

मिरज-लोंढा मार्गाचे २०२० पर्यंत दुहेरीकरण

Published On: Jun 19 2019 1:34AM | Last Updated: Jun 18 2019 8:12PM
बेळगाव : प्रतिनिधी

मिरज-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरी करणाचेे काम गतीने सुरु असून,  माती टाकून सपाटीकरणारचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे.  या महिनाभरात त्यावर खडीकरण करण्यात येणार आहे. डिसेंबर 2020 पर्यंत मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली आहे. सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री झाल्याने  या कामाला गती आली आहे. 

मिरज ते बेळगाव दरम्यान मातीचा भराव टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कुडची (ता. रायबाग)  येथे कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम 10 महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून, नव्या पुलाचे काम युध्दपातळीवर आहे. मलप्रभा नदीवरील पुलाचे कामही येत्या चार महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामाला गती देण्यासाठी आठ दिवसांपुर्वीच रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिल्‍लीमध्ये रेल्वे बोर्डाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे ते लोंढा मार्गाचे तात्काळ दुहेरीकरणा करण्याचे  आदेश दिले आहेत. यावेळी अधिकार्‍यांनी डिसेंबर 2020 पर्यत मिरज-लोंढा मार्गाचे काम पूर्ण होईल असे अश्‍वासन दिले आहे. मिरज - पुणे मार्गावर अनेक घाट असल्याने याच्या कामाची गती मात्र मंदावली आहे. 

पुणे- मिरज आणि लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी वाढल्यानंतर 2004 मध्ये सर्व्हे करण्याचा निर्णय केंद शासनाने घेतला. त्यानंतर याबाबत 2014 पर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर रेल्वे बोर्डाने 2014 साली याचे सर्व्हेक्षण पूर्ण केले.  यानंतर रेल्वे मंत्रालयाने या मार्गाच्या दुहेरीकरणास मंजूरी दिली. 2016 पासूनच पुणे ते लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे ते मिरज आणि मिरज ते लोंढा अशा दोन कामांसाठी चार ठेकेदारांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

जवळपास 70 हून अधिक ओढे, नाल्यावरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात मातीच्या भरावावर खडीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या या दुहेरी मार्गाने प्रवाशांच्या वेळेत सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी बचत होणार आहे. त्याचबरोबर माल वाहतूकही गतीने होऊन बेळगाव जिल्ह्याचा औद्योगिकसह इतर विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या महसुलामध्ये  वाढ होणार आहे. 

सध्या मिरज-लोंढा मार्गावर मालवाहतुकीसह 48 ते 50 गाड्यांची या मार्गावरून वाहतूक होत असते. ही संख्या 50 ते 60 करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या दुहेरी रेल्वे मार्गाने गतीबरोबर विकास साधणे शक्य होणार आहे. 

पुणे-लोंढा मार्ग एक नजर...

एकूण लांबी 467 कि. मी. 

मे 2016 ला दुहेरीकरणास 3 हजार 627 कोटी मंजूर

प्रत्येक वर्षी पाच टक्के खर्चाची वाढ धरणार

एकूण 4 हजार 246 कोटींचा प्रकल्प 

मिरज-लोंढा मार्गावर रोज 48 ते 50 गाड्यांची ये जा. 

मार्गात जवळपास 70 ओढे. 

मार्गाच्या दुहेरी आणि विद्युतीकरणास 2021 पर्यंत मुदत

मिरज-लोंढा मार्गातील माती आणि भरावाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. आता रेल्वे राज्यमंत्री बेळगाव जिल्ह्याचे असल्यामुळे काम  वेळेपेक्षा कमी कालावधीत होण्याची शक्यता आहे. दुहेरीकरण झाल्यास जवळपास 40 टक्के वेळ वाचेल आणि गाड्यांची संख्याही वाढेल. 
- सुकुमार पाटील, सचिव, रेल्वे कृती समिती, मिरज

आठ दिवसांपूर्वीच या कामाचा आपण आढावा घेतला आहे. हे काम गतीने करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.  2020 पर्यंत निदान मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होईल. या कामाचा वेळोवेळी आढावा घेऊन कामाला गती देण्यात येईल. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील विकासाला चालणार मिळेल.
- सुरेश अंगडी,रेल्वे राज्यमंत्री