Sat, Aug 08, 2020 15:08होमपेज › Belgaon › बांधकाम क्षेत्र कामगारांचे जीवनच बेभरवशाचे 

बांधकाम क्षेत्र कामगारांचे जीवनच बेभरवशाचे 

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 8:56PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

निपाणी शहर तसेच लागून असणार्‍या जवळच्या गावांत महानगरांशी स्पर्धा करणार्‍या इमारती उभ्या राहत आहेत. त्यातून अनेकांचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. मात्र, असे बांधकाम करणार्‍यांचे आयुष्यच बेभरवशाचे बनले आहे.

बांधकामावरील मजूर, सेंट्रिंग कामगार म्हणून काम करणार्‍यांना बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरकडून ना विम्याचे  संरक्षण, ना सबळ आर्थिक मदत अशी स्थिती या क्षेत्राची आहे. इतरांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता करता काहींच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागून त्यांची कुटुंबे वार्‍यावर पडत आहेत.  सुरक्षेच्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलेले नाही.त्यामुळे  सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी होणार्‍या अपघात घटनात वाढ होत  आहे.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेण्याची आणि परत सोडण्याची व्यवस्था ही सबंधितांकडून होत  असते. विशेष करून बांधकाम सुरू असताना रोज होणारे अपघात असंख्य असतात. हेल्मेट बेल्टसारखी सुरक्षेची साधने नावालाच आहेत. त्यांचा वापर कोठेही होताना दिसत नाही. त्यामुळे अशी कामे करताना पायात सळी घुसणे, सिमेंटमधील केमिकल्समुळे हाताला इजा होणे, इतर साईडइफेक्ट होणे, उष्णतेचा त्रास या गोष्टींशी झुंजत सेंट्रिग कामगाराची मोलमजुरी सुरू असते. 

उंच उंच जाणार्‍या इमारतीवर सिमेंट, वाळू वाहून नेताना तर कसरतच करावी लागते. इमारतीच्या मध्यभागी बांधला गेला असला तरी एका बाजूने जिना हा रिकामाच असतो. त्यांच्यावरून चालताना चुकून तोल गेला तरी प्राण गमवावे लागतात.अशा स्थितीत आजही बांधकामे सुरू आहेत. घडलेल्या घटनेची इतर ठिकाणी कोठेही माहिती होऊ नये याची काळजी तातडीने घेतली जाते. कामगारांच्या आयुष्याची पुरेशी काळजी घेण्याचे औदार्य मात्र कोणी दाखवत नाही.   

कामगार खाते  कार्यरत असले तरी या खात्याकडून कामगाराच्या बाजूने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना नाहीत किंवा त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जात नाहीत. दरवर्षी कामगार दिन आला की सर्वांना त्यांच्या अडचणी समजतात. त्यामुळे सरकारने अशा घटकांसाठी विशिष्ट पावले उचलून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दरवर्षी अंमलात येणार्‍या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत वैयक्तिक स्वरूपात कसा  पोहोचेल हे पाहणे गरजेचे आहे.