Thu, Nov 26, 2020 20:22होमपेज › Belgaon › बलात्काराची खोटी केस केल्याने 15 लाखांच्या भरपाईचे आदेश

बलात्काराची खोटी केस केल्याने 15 लाखांच्या भरपाईचे आदेश

Last Updated: Nov 22 2020 2:02AM
चेन्‍नई : वृत्तसंस्था

तरुणीने दाखल केलेल्या बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात 7 वर्षे कारावासात गेली. यादरम्यान अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला हा तरुण पदवीलाही मुकला. आता न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्‍त केले आहे आणि त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे सिद्ध झाल्याने फिर्यादी तरुणीने 15 लाख रुपयांची भरपाई या तरुणाला द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तामिळनाडूतील चेन्‍नईतील रहिवासी असलेल्या संतोष या युवकाची 7 वर्षे बदनामी झाली ती वेगळी. संतोषवर त्याच्या शेजारीच राहत असलेल्या तरुणीने बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. 

बलात्कारातूनच आपण गर्भवती झाल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटलेले होते. पुढे तिच्या बाळाची आणि आपली डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी संतोषने केली. चाचणीअंती संतोष त्या बाळाचा पिता नसल्याचे सिद्ध झाले.

संतोष याने निर्दोष सुटल्यानंतर तरुणीवर भरपाईचा दावा दाखल केला. पोलिसांना तसेच तरुणीच्या आई-वडिलांनाही प्रतिवादी केले आणि 30 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली.

दोघांचे लग्‍न ठरले होते, घाईने संशय

संतोष याचे वकील सिराजुद्दीन यांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी आणि संतोष एकाच जातीचे होते. दोघांचे लग्‍न ठरलेले होते. मुलीच्या कुटुंबाने लग्‍न तातडीने करण्याचा प्रस्ताव दिला. तो संतोषने नाकारला. त्यामुळे मुलीने बलात्काराची फिर्याद नोंदविली. संतोषला 12 फेब्रुवारी 2010 रोजी अटक झाली. तीन महिन्यांनी त्याला जामीन मिळाला.