Sat, Aug 08, 2020 13:45होमपेज › Belgaon › व्यवसाय टेलर... बनले डॉक्टर!

व्यवसाय टेलर... बनले डॉक्टर!

Published On: Mar 25 2019 1:48AM | Last Updated: Mar 24 2019 11:41PM
खानापूर : प्रतिनिधी

ध्येयाचा सतत ध्यास बाळगला की प्रयत्नांचा त्रास होत नाही, असे म्हटले जाते. आपल्या मार्गात कितीही अडथळे आले, तरी ध्येयापासून परावृत्त न होणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. अशीच किमया प्रा. यशवंत नारायण पाटील यांनी करून दाखविली आहे. टेलरिंग व्यवसाय करत त्यांनी पीएचडी संपादन केल्याने त्यांच्या कष्टाचे कौतुक होत आहे. 

प्रतिकूल परिस्थितीने वाट अडवली तरीही खचून न जाता काही माणसे संकटांनाच यशोशिखराकडे जाणारी पायरी करून त्यावर ठामपणे उभी राहतात. असाच काहीसा प्रवास प्रा. यशवंत पाटील यांचा म्हणावा लागेल. मूळचे कसबा नंदगड व सध्या खानापुरात वास्तव्यास असून, ते टेलरिंग व्यवसाय  करतात. अतिथी प्राध्यापक म्हणून बिडी सरकारी महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करत असलेल्या पाटील यांनी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांमधील सातत्याच्या जोरावर लहानपणी बघितलेले पीएचडी मिळविण्याचे स्वप्न वयाच्या 46 व्या वर्षी साकार केले आहे.

कसबा नंदगड येथील शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. वडील गावातच शिंपी व्यवसाय करत. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे यशवंत यांनी चौथीतच शाळा सोडली खरी, मात्र वडिलांनी तू अजून शिकायला हवेस. असे सांगून पुढच्या वर्षी पुन्हा शाळेत घातले. तेव्हापासून सतत पुस्तकांची सोबत करत नंदगडमधील म. गांधी महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केली. दरम्यान, वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी अंगावर पडली. घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी एकवेळ कॉलेज आणि दुपारनंतर नंदगडमधील एका टेलरकडे कामाला जाऊन प्रसंगी पोटाची भूक अर्धवट ठेवली, पण ज्ञानाची भूक भागविण्यास प्राधान्य दिले.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून नुकतीच त्यांची डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली आहे. यासाठी त्यांनी 1980 नंतरच्या ‘कन्नड-मराठी कथा साहित्याचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. या प्रबंधाच्या पूर्ततेसाठी त्यांनी कन्नड व मराठीमधील अनेक प्रसिद्ध कथा लेखकांच्या भेटीगाठी घेऊन  पाच वर्षे विशेष परिश्रम घेतले. याकामी त्यांना डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यापीठाकडून त्यांच्या प्रबंधाचा स्वीकार करण्यात आल्याने सीमाभागातील प्रतिकूल परिस्थितीत साहित्यसेवा देणार्‍या तरुणांसाठी पाटील यांच्या रुपाने नवा आदर्श निर्माण झाला आहे.

अत्यल्प खर्चात शिक्षण

पाटील यांनी स्वतःबरोबरच पत्नी कल्पना यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. पत्नीचे एम. ए. आणि एम. फिलपर्यंतचे शिक्षणही त्यांनी पूर्ण करून घेतले. बेळगावमधील एका बी. एड. महाविद्यालयात त्या मराठी विषयाचे अध्यापन करतात. विशेष म्हणजे, पाटील यांनी प्रबंध लेखनासाठी वापरलेले व एका बाजूने कोरे पेपर वापरून अत्यल्प खर्चात डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास केला.