बेळगाव : जितेंद्र शिंदे
चिनाब नदी पार करण्यासाठी आतापर्यंत सहा तासांचा अवधी लागत असे; पण केंद्र सरकारने नदीवर पूल उभारणीचा निर्णय घेतला. सतत सहा वर्षे काम करून या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेसाठी जगातील सर्वात मोठा पूल उभारून झाला आहे. लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे; पण या पूल उभारणीत बेळगावच्या कंपनीचाही हातभार लागला असून बेळगावचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
काश्मीर हा दर्याखोर्यांचा प्रदेश आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होणार आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंकचा हा प्रकल्प आहे. रेल्वे खात्याने हा प्रकल्प सुरू केला. अफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर (मुंबई) या कंपनीला ठेका मिळाला. त्यांच्या माध्यमातून हा पूल उभारणीसाठी हायड्रोलिक उपकरणांसाठी बेळगावच्या हायड्रोपॅक इंडिया कंपनीला ठेका मिळाला.
हायड्रोपॅक कंपनीने या प्रकल्पाचा पाया तपासण्यापासून अवजड उपकरणे चढवण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार अत्याधुनिक पद्धतीचे जॅक तयार केले. पहिल्या आधारासाठी 100 ते 800 टन क्षमतेचे जॅक, मधल्या आधारासाठी 100 ते 600 टन क्षमतेचे जॅक, वरील आधारासाठी जॅक, ट्रॉली, वजनदार स्ट्रील वर, खाली नेण्यासाठी हायड्रोलिक उपकरणे आदी उपकरणांची निर्मिती करण्यात आली. बेळगावात उत्पादन करून दिल्लीमार्गे पुलाच्या कामावर हे साहित्य जात होते.
हायड्रोलिक इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि व्यवस्थापक परेश नार्वेकर यांच्या देखरेखीखाली उत्पादनांची निर्मिती करण्यात आली. चिनाब पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटर उंच हा पूल आहे. या पुलामुळे सहा तासांचे अंतर केवळ 15 मिनिटांवर आले आहे. त्यामुळे जगभरात या पुलाची चर्चा सुरू असून त्याच्या उभारणीत बेळगावकरांचा सहभाग असल्यामुळे बेळगावच्या औद्योगिक विश्वात मानाचा तुरा खोवला आहे.
बेळगावच्या हायड्रोपॅक इंडिया या कंपनीने या आधी उपग्रहासाठी लागणार्या यंत्रसामुग्रीची निर्मिती केली आहे. त्यानंतर आता जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिजच्या निर्मितीतही हातभार लावल्यामुळे हा विषय कौतुकाचा बनला आहे.
असा आहे चिनाब ब्रिज
1315 मीटर लांब
नदीपासून 369 मीटर उंचीवर
पॅरिसच्या आयफेल
टॉवरपेक्षा 35 मीटर उंच
संपूर्ण बांधणी स्टीलमध्ये
बांधकामासाठी बेळगावच्या
हायड्रोपॅक इंडियाकडून
हायड्रोलिक उपकरणांचा पुरवठा