Mon, Sep 28, 2020 07:25होमपेज › Belgaon › आनंद गोगटे यांची 1980 च्या निवडणुकीत कडवी झुंज

आनंद गोगटे यांची 1980 च्या निवडणुकीत कडवी झुंज

Published On: Apr 03 2019 1:43AM | Last Updated: Apr 03 2019 12:48AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची रचना कन्नड भाषिकांना अनुकूल अशा पद्धतीने सुरुवातीपासून केलेली आहे. मराठी बहुभाषिक प्रदेश एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केला आहे. परिणामी मराठी भाषिकांना लोकसभा निवडणुकीत अद्याप यश मिळालेले नाही. परंतु, उद्योगपती आनंद गोगटे यांनी 1980 साली कडवी झुंज दिली. निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिली तरी दुसर्‍या क्रमाकांची मते मिळवली. 

सीमाभागात मराठी बांधव लाखोंच्या संख्येने आहे. परंतु तो विखुरला गेला आहे. एकगठ्ठा मतदानाअभावी विजय मिळविणे शक्य होत नाही. खानापूर, निपाणीसारखा मराठी बहुल भाग कारवार आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघात घातला आहे. यामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यात असणार्‍या मराठी भाषिकांच्या मतावर विजय मिळविणे शक्य होत नाही. 
1980 च्या लोकसभा निवडणुकीत आनंद गोगटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. याला मराठी भाषिकांनी पाठिंबा दिला.परंतु, मतदारसंघात असणारे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व मोडून काढणे शक्य झाले नाही. काँग्रेस पक्षात दोन गट पडून देखील आय काँग्रेसचे एस. बी. सिदनाळ हे विजयी झाले.

त्यावेळी मतदारसंघात 7 लाख 2 हजार 656 इतके मतदार होते. यापैकी 4 लाख 28 हजार 774 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यामध्ये 12 हजार 782 मते बाद झाली. 
विजयी उमेदवार सिदनाळ यांना 2 लाख 17 हजार 527 मते मिळाली. आनंद गोगटे यांना 76 हजार 330 मते मिळाली. काँग्रेस (यू.) चे उमेदवार माजी खा. ए. के. कोट्रशेट्टी यांना 62 हजार मतावर समाधान मानावे लागले. याशिवाय नऊ उमेदवार रिंगणात होते.  

लोकसभेच्या निवडणुकीत मराठी मतदार एकवटण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच झाला. याला अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसने मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. यानंतर सलग चारवेळा एस. बी. सिदनाळ यांनी मतदारसंघावर वर्चस्व ठेवले.