Sat, Aug 08, 2020 15:09होमपेज › Belgaon › पावसाच्या सरी बरसल्या, रानभाज्या आल्या

पावसाच्या सरी बरसल्या, रानभाज्या आल्या

Published On: Jul 19 2019 2:13AM | Last Updated: Jul 19 2019 2:13AM
बेळगाव (प्रतिनिधी) : पावसाच्या सरी धरणीला मिळाल्या की डोंगरातील, रानावनातील जमिनीत रुतून असलेली असंख्य बियाणी, मुळे कोंब फुटून जमिनीवर येऊ लागतात. बघता बघता पूर्ण परिसर हिरवागार होतो. या हिरव्या गालिच्यात काही रानभाज्या डोकी वर काढतात. काही रानभाज्यांचा नुसता पाला खाण्यालायक असतो तर काही भाज्यांचे कंद, पाला, फुले, फळे असे विविध प्रकार भाजी बनविण्यासाठी वापरले जातात.

वर्षातून एकदाच मिळतात या रानभाज्या, तरीही त्या तशा वाजवी दरात मिळतात. आता इंटरनेटवर, समाजमाध्यमांवरही या रानभाज्यांची महती वाचायला मिळते, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

शेवळं 

मे महिन्याच्या दाहक वातावरणात शेवळाच्या कंदांना कोंब फुटतात. या कोंबांची म्हणजेच शेवळांची भाजी करतात. या भाजीला खूप खाजरेपणा असतो. खाज कमी करण्यासाठी काकडं नावाची आंबट-तुरट रानफळे किंवा चिंच या भाजीत घालतात. शेवळं सोलली की त्यातील खालील हळदी रंगाचा भाग काढून टाकायचा असतो, कारण तो जास्त खाजरा असतो. मग वरचा दांडा आणि कोंबाचा पाला कोवळा असल्यास तो कापून घ्यायचा आणि तो भाजीत घालायचा. 

कुरडू 

हिरवी आणि पानाच्या मध्यभागी थोडी लालसर छटा असणारी कुरडूूची भाजी. हिची चव साधारण माठाच्या भाजीसारखी असते. ती डाळी घालून कांद्यावर करतात.

भारंगी 

भारंगीचे झाड असते. पावसाळ्यात त्याला चांगली कोवळी पालवी येते. ही भाजी थोडी कडवट असते. याची पाने उकळून ते पाणी पिळून मग भाजी केली जाते. भाजी कांद्यावर नुसती डाळ टाकून तसेच कडवे वाल भिजवून ते सालासकट घालून केली जाते.

कुलू/फोडशी 

ही भाजी दिसायला साधारण कांद्याच्या पातीसारखी पण रुंद पातीची असते. ही भाजी काहीजण उकडून करतात. तसेच चिरून करण्याचीही पद्धत आहे. ही भाजीही डाळीत घालून, नुसती अथवा बेसन पेरून करता येते.

कोरलं 

कोरलं या भाजीची पाने आपटा/कांचनच्या पानाच्या आकाराची असतात. पाने मऊ असतात. ही भाजी पालेभाजीप्रमाणे करतात. ती चविष्ट व खुसखुशीत लागते.

कवळा 

कवळा ही भाजी चिंच,लाजाळूच्या पानांप्रमाणे दिसते. ही भाजी श्रावणात येते. श्रावणी सोमवारी ही भाजी मुगाच्या भाजीत किंवा आमटीत घालून करतात. याची कोथिंबीरवडीप्रमाणे वडी करता येते, आमटीतही घालता येते.

आंबट वेल 

कोणतीही आमटी, आंबट वरण किंवा मच्छीच्या कालवणामध्ये ही आंबटवेल आंबटपणासाठी टाकतात. या वेलीचे वरचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून आमटीत घातले जातात.

दिंडा 

दिंड्याची देठे बाजारात विकायला येतात. देठे शेवग्याच्या शेंगांप्रमाणे सोलून घ्यायची. ही देठे कडधान्याच्या भाजीत, आमटीत, मच्छीच्या कालवणात घालता येतात.

कंटोळी 

बाहेरून काटेरी असणारी कंटोळीची आजकाल मुद्दाम लागवडही करण्यात येते. त्यामुळे ही भाजी बारा महिनेही काही ठिकाणी दिसते. हिरवीगार आणि बाहेरून काटेरी अशी ही भाजी बटाट्याच्या काचर्‍यांप्रमाणे, बिरड्यामध्ये व कडधान्यांत घालून केली जाते.

वाघेटी 

वाघेटीची फळे असतात. त्याचे साल काढून व आतील बिया काढून, फोडी करून त्या पांढर्‍या वाटाण्यात बटाट्याप्रमाणे टाकतात. तसेच ही भाजी चणाडाळ घालून किंवा तोंडलीच्या भाजीप्रमाणे करतात. ही फळे थोडी कडवट असतात.

टाकळा 

जुलै,ऑगस्ट दरम्यान टाकळा भाजी येते. हिची पाने लंबगोलाकार व थोडी जाडसर असतात. ही भाजी पालेभाजीप्रमाणे कांद्यावर वा डाळीत घालून करतात. सुरुवातीला तव्यावर पाला भाजून नंतर भाजी करण्याचीही पद्धत आहे.

टेरी/अळू 

टेरीची पाने हिरवीगार व देठ पांढरे असतात. काही काही टेरीची पाने काळपट असतात. (वडीच्या पानांच्या अळूची पाने एकदम काळी असतात, त्यापेक्षा ही कमी काळी असतात.) या काळपट देठांच्या अळूला खाज येते. साफ करतानाही हात खाजतात. यात चिंच जास्त घालावी लागते. पांढर्‍या देठाच्या टेरीला खाज कमी असते. याची चिंच, गूळ घातलेली पातळ भाजी अतिशय चविष्ट लागते.

भोपरं/भुईछत्री/अळंबी 

भुईछत्र्या या रानात, डोंगरात, भुसभुशीत जमिनीत ढग गडगडायला लागल्यावर येतात, असे म्हणतात. मात्र भुईछत्र्या खाण्याच्या आहेत ना, याची खात्री करून घ्यावी, कारण यात विषारी प्रकारही असतात. 

तालिमखाना 

तालिमखानाची रोपे कोवळी असतानाच त्याची भाजी केली जाते. कारण नंतर त्यावर काटे येतात. ही झाडे मोठी झाली की त्यांना निळी फुले येतात. सुकल्यावर त्यात बी तयार होते. त्या बियांची पेज करतात. ती शक्तिवर्धक असते, असे  म्हणतात.

हादगा/अगस्ती 

अगस्तीचे मोठे झाड असते. चिंचेच्या पानांसारखी पण थोडी मोठी अशी पानांची रचना असते. या झाडाला कुयरीसारखी पांढरी फुले लागतात. त्या फुलांची भाजी करतात व भजीही करतात. याला लागणार्‍या शेंगांचीही भाजी करतात.

पूर्णपणे नैसर्गिक गुणांनी युक्‍त

या रानभाज्या कोणतेही खत घालून पिकवलेल्या नसतात वा त्यांच्यावर कोणत्याही औषधांचे संस्कार केलेले नसतात. त्यामुळे या नैसर्गिक गुणांनी युक्‍त अशा रानभाज्या असतात. डोंगर-रानात या रानभाज्यांच्या सहवासात जगणार्‍या आदिवासी जमातीतील व्यक्‍तींना या रानभाज्यांची चांगलीच जाण असते. सर्वसामान्यांनी मात्र कोणत्या रानभाज्या निवडायच्या, त्या कशा खायच्या ते जाणकारांकडून जाणून घ्यावे. कारण रानात काही विषारी झाडे-वेलीही असतात. त्यामुळे रानभाज्या घेण्याच्याअगोदर त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.