Thu, Oct 01, 2020 18:38होमपेज › Belgaon › गोव्याचा रस्ता चुकले अन् कॉलेजचे फ्रेंड जीवाला मुकले

गोव्याचा रस्ता चुकले अन् कॉलेजचे फ्रेंड जीवाला मुकले

Published On: Jun 04 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 1:29AM
बेळगाव : प्रतिनिधी

महामार्गावरील श्रीनगर गार्डनजवळ भीषण अपघातात सात मित्र ठार झाल्याच्या वृत्ताने बेळगावातही हळहळ व्यक्‍त होत आहे.  कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन ते गोव्यालाच निघणार होते. परंतु, इंडाल ब्रीजजवळून खाली उतरण्याऐवजी ते सरळ पुढे गेले. जेथे अपघात घडला तेथून पुढे फर्लांगावरच श्रीनगरमध्ये अथवा त्याच्या थोडेसे पुढे अलारवाड ब्रीजजवळून उतरून त्यांना गोव्याला जायचे होते. परंतु, टायर फुटल्याचे निमित्त होऊन त्यांच्यावर काळाने घाला घातला.

नंदू किशनराव पवार (वय 27, शरणापूर), सुरेश कैलास कान्हेरे (25), अमोल हरिश्‍चंद्र निले (27), अमोल रमेश चवरे (25), रवींद्र मच्छिंद्र वाडेकर (28, सर्वजण रा. शरणापूर), गोपी कडुबा वरकड (30) व महेश नंदू पाडळे (24, दोघेही रा. दौलताबाद) या सात जणांच्या मृत्यूची सोमवारी दिवसभर बेळगावात चर्चा होती. त्यांचे नातेवाईक सोमवारी पहाटे बेळगावात पोहोचले. यानंतर दिवसभर उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास सर्व तरुणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले. 

या ठिकाणी नातेवाईकांची भेट घेतली असता त्यांनी अपघातापूर्वीच्या आठवणी माध्यम प्रतिनिधींना सांगितल्या.  शनिवारी सकाळी दहा वाजता ते औरंगाबादजवळील दौलताबादहून सुटले. आधी हे सर्वजण जेजुरीला गेले, तेथून कोल्हापूर अंबाबाईचे दर्शन घेऊन बेळगावला आले. येथे आल्यानंतर गोव्याला जाण्यासाठी इंडाल ब्रीजजवळून खाली उतरायचे होते. परंतु, रस्त्याबाबत गोंधळ निर्माण झाल्याने ते सरळ पुढे गेले. त्यांना बहुदा पुढे जाऊन श्रीनगर ब्रीज अथवा अलारवाड ब्रीजपासून त्यांना खाली उतरायचे असावे. परंतु, श्रीनगर गार्डन ब्रीजपासून अवघ्या अर्धा किलोमीटर मागे असतानाच त्यांच्या कारचे टायर फुटले व पुढील अनर्थ घडला. जर ही कार इंडाल ब्रीजपासूनच खाली उतरली असती तर तिचा वेग कमी असता, जरी टायर फुटले असते तरी इतका भयानक अपघात घडला नसता आणि कदाचित ते वाचले देखील असते, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. 

सर्वजण कॉलेजपासूनचे मित्र 

हे सर्वजण कॉलेजपासूनचे मित्र होते. अमोल चवरे हा एकुलता होता व त्याचे येत्या 26 जूनला लग्न होते. रविंद्र वाडेकर हा देखील एकुलताच होता. तो व सुरेश कान्हेरे हे पेट्रोल पंपावर कामाला होते., अमोल निले हा कंपनीत तर महेश पाडळे हा किराणा दुकान चालवायचा. गोपी वरकड याचा दुग्धव्यवसाय होता, तर नंदू पवारचे बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान शिवाय तो राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. 

शिवराज्याभिषेकाचे स्वप्न अधुरेच

हे सर्व मित्र दरवर्षी पर्यटनाचे नियोजन करीत होते. शिवभक्त असणारे हे तरुण आधी रायगडावर शिवराज्याभिषेक करायचे. त्यानंतर ते कर्नाटक व गोव्याला फिरण्यासाठी जात होते. यंदा 6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक आहे. आधी फिरून यायचे आणि नंतर 6 तारखेला शिवराज्याभिषेकात सामील व्हायचे, हे त्यांचे नियोजन. तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला असून, त्यांचे शिवराज्याभिषेकला जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.