Sat, Aug 08, 2020 14:10होमपेज › Belgaon › पोलिसांनी आवळल्या २०० जणांच्या मुसक्या 

पोलिसांनी आवळल्या २०० जणांच्या मुसक्या 

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 12:17AM
निपाणी : मधुकर पाटील

निपाणी परिसरात गेल्या वर्षभरापासून उघडपणे चालणार्‍या  मटका व्यवसायाला आता घरघर लागली असून, पोलिसी कारवाया लक्षात घेवून यातील व्यावसायिकांनी आता आपल्या व्यवसायाचे रूपच पूूर्णत: पालटले आहे. हे व्यावसायीक आता अंदर बाहर (52 पानी) जुगार या प्रकारात आपले चांगले बस्तान बसविले आहे.असे असले तरी  गेल्या वर्षभरात जुगार,मटका व बेकायदा दारू विक्री करणार्‍या तब्बल 200 जणांच्या  निपाणी पोलिसांनी  मुसक्या आवळल्या आहेत.

अलीकडच्या काळातच अंदर बाहर प्रकारच्या जुगारचे नव्याने फॅड अंमलात आले आहे. एरव्ही फावल्या वेळेत कमी महत्व समजून खेळला जाणारा हा खेळ सध्या मात्र चर्चेत आला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही मागे नाही. त्यामुळे येथील चार स्थानकांमध्ये आठवड्यात किमान या प्रकारातील तीन ते चार गुन्हे नोंद होत आहेत.

या खेळाला अगदी तरुण मुलेच बळी पडत आहेत. एकमेकांच्या संगतीतून आजचा तरुण या खेळाकडे आकर्षिला जावू लागला आहे.काही ठिकाणी तर हा खेळ अनेकजण सार्वजनिक जागेचा वापर करून करीत आहेत. यात धार्मिक स्थळेही बदनामी होत आहेत. असे खेळ खेळणार्‍यांकडून मात्र मंदिराचे पावित्र्यच राखले जात नसल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या वर्षभरात निपाणी शहराबरोबरच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असा खेळ खेळणार्‍यांच्यावर पोलिसी कारवाया झाल्या आहेत. शहर, ग्रामीण, बसवेश्‍वर चौक, खडकलाट अशा चार स्थानकात मिळून 100 हून अधिक घटनांची नोंद असून 200 जणांवर कारवाई झाल्याचे पुढे आले आहे. एवढे होवूनही खेळ खेळणार्‍यांची संख्या वाढतच चालली आहे.

मटका हा खेळ तसा सहजासहजी न समजणारा खेळ आहे. त्यामुळे पदरची रक्कम द्यायची आणि पदरात मात्र काहीच नाही हे गृहीत धरून अनेकजण मटका खेळाकडे दुर्लक्ष करून, निवांतपणे खेळण्यात येणार्‍या तीन पानी जुगार व्यवसायाकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे. हा खेळ म्हणजे बुध्दीच्या जोरावर 52 पानाच्या आधारे खेळून डाव मारला जातो. यात राजा—राणी, बदाम—किल्वर या अधारे हा डाव रंगतदार ठरतो. 

पोलिसांच्या कारवाईवरून असे दिसून आले आहे की, आजची युवापिढीच पूर्णत: या खेळाच्या आहारी जात आहे. कारण आजच्या युवापिढीचे राहणीमान पूर्णत: बदलले आहे. मोबाईल, मद्यपान, गुटखा, आदी अनेक व्यसने आजच्या युवापिढीला जडू लागल्याने, युवापिढी ही अभ्यासात मागे व खेळात पुढे असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरापासून पोलिस खात्याने मटका हा खेळ नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला असल्याने काहींनी याकडे दुर्लक्ष करून, एरवी केवळ फावल्या वेळेत जत्रा-यात्रा काळात खपणारे 52 पत्याच्या किटच्या  मागणीकडे वळले आहेत. यापूर्वी तपास यंत्रणेला मटका व्यावसायीकांना पकडणे सोपे होते.कारण तेच ते व्यावसायीक व खेळणारे असल्याने काहींच्यावर जुजबी कारवाई व्हायची. आता मात्र तसे नाही. तर तीन पानी जुगार हा खेळ खेळणारे नवीन म्होरके असल्याने तपास यंत्रणेला नेमकी कोणती भूमिका घ्यायची हेच कळेनासे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत तर जुगार व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी तपास यंत्रणेला बर्‍यापैकी यश आले आहे.पोलिसी भाषेत मटक्याला ओसी तर जुगाराला गँबलिंग असे म्हणून संबोधले जाते.त्यामुळे कारवाई झाली तर पोलिसांच्या यादीवर मात्र प्रचलित शब्दाचा वापर होत असल्याचे अप्रुप खेळणार्‍यात आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी मटका व्यावसायीकांवर कारवाया या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. अशाकाळात पोलिस यंत्रणेकडून नामधारी गुन्हा दाखल केल्याने बर्‍याच वेळेला सबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते अथवा त्याला हजार, पंधराशे रुपयाचा जामीन दिला जातो. त्यामुळेच असा खेळ खेळणारे मुर्दाड बनलेले आहेत.त्यांना झालेल्या कारवाईचे कोणतेच सोयरसूकत नसते. त्यामुळे कायदा बदलणे अथवा जबरी गुन्ह्याखाली कलमानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. नाहीतर या कारवाईने केवळ पोलिसांचे रेकॉर्ड होणार आहे.

अलिकडच्या काळात पोलिसांनी गेल्या वर्षभरात मटका,जुगार या व्यवसायिकांवर करडी नजर ठेवली आहे.आजमितीस हा खेळ खेळणार्‍या व मटका जुगार घेणार्‍यांनी सिमाभागाचा आश्रय घेतला आहे.बेळगाव जिल्हयात निपाणी परिसरात वरील प्रकार अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यास प्रशासनाला यश आले आहे.अद्यापही आपल्या परिसरात गावात,गल्ली बोळात अशा प्रकारे मटका घेणे जुगार खेळणे अथवा बेकायदा दारू विक्री करणे असे प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी  वेळीच संपर्क साधावा तसे झाल्यास माहिती देणार्‍याचे नाव गुपित ठेवून धडकपणे कारवाई केली जाईल.-एच.डी.मुल्ला, उपनिरीक्षक शहर पोलिस ठाणे,निपाणी