Sun, Jan 17, 2021 10:51
बेळगावात १५ कोटींचा जीएसटी घोटाळा 

Last Updated: Jan 14 2021 1:51AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पुरवठादारांची बनावट बिले करून तब्बल 14 कोटी 74 लाख रुपयांची जीएसटी चुकविणार्‍या रस्ते बांधकाम कंपनीच्या संचालाकाला  दोन दिवसांपूर्वी बेळगावात अटक झाली आहे. मनोजकुमार प्राणनाथ अबरोल असे त्यांचे नाव असून, त्यांची सुवर्णा बिल्डकॉन प्रा. लि. कंपनी आहे. 

याबाबतचे पत्रक जीएसटी गुप्तचर विभागाचे मुख्य अतिरिक्‍त संचालक जेन करुना नॅथनिअल यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मनोजकुमार यांची बांधकाम कंपनी कर्नाटक महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कार्यरत असून त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस पुणे येथे आहे. या कंपनीकडून अनेक सरकारी रस्ता कामाची थेट निविदा घेतली असून काही कामे उपकंत्राटदार म्हणून करते.  परंतु, या कंपनीने आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) न भरता 11 पुरवठादारांच्या नावे बनावट बिले बनवली आहेत. तसेच काही पुरवठादार अस्तित्त्वातही नाहीत. 

ही रक्कम तब्बल 14 कोटी 74 लाख रूपये असून, कंपनीने बोगसगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जीएसटी विभागाने याची सखोल चौकशी करून 11 जानेवारी रोजी मनोजकुमार यांना अटक करून 12 रोजी मंगळूर येथील मुख्य दिवाणी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 25 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले आहेत.