Wed, May 19, 2021 05:49
आव्हान कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे

Last Updated: Apr 11 2021 1:02AM

डॉ. शेखर सी. मांडे

गतवर्षी डिसेंबरपासून म्हणजेच कोरोनाबाधितांचे आकडे कमी होऊ लागल्यानंतर आपल्याकडे प्रतिबंधात्मक उपायांबाबत ढिलाई दिसून आली; पण हा गाफीलपणाच आता दुसर्‍या लाटेच्या रूपाने आव्हान बनून उभा राहिला आहे. कोरोनाचे नवनवीन व्हेरियंटस् येत आहेत. अशावेळी मागील चुकांपासून धडा घेऊन आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 

जगभरात आतापर्यंत आलेल्या सर्व महामारींचा (पँडेमिक) किंवा विषाणू संसर्ग आजारांच्या साथींचा अभ्यास केला असता, त्या नेहमीच लाटेच्या स्वरूपात आलेल्या दिसतात. 1918-19 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या बाबतही हेच दिसून आले होते. गेल्या जवळपास वर्षभरापासून थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूबाबतही तेच घडताना दिसत आहे. या लाटांमधील अंतर किंवा कालावधी किती असतो, याचा अंदाज बांधणे कठीण असते. कोरोनाचा विचार करता गतवर्षी आलेल्या पहिल्या लाटेनंतर भारतासह अनेक देश आज दुसर्‍या लाटेचा सामना करत आहेत. त्याचवेळी फ्रान्स, इटली या देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. हा धोका लक्षात घेऊन भारतातील दुसरी लाट तत्काळ आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ‘कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियर’चे काटेकोरपणाने पालन होणे आवश्यक आहे. 

मार्च 2020 मध्ये जेव्हा कोरोना भारतात आला तेव्हा या विषाणूबद्दल समाजमनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारीचे उपाय अवलंबले गेले. परंतु, साधारणतः गेल्या डिसेंबर महिन्यापासून ही भीती बर्‍याच प्रमाणात कमी होत गेलेली दिसली. बाधितांचे आकडे कमी कमी होत गेल्याने बहुधा या आजाराची साथ आता संपली आहे, असा लोकांचा समज झाला; पण हा समज किती चुकीचा होता, हे आता आपल्यासमोर आले आहे. किंबहुना, त्याचे गंभीर परिणाम आपण सर्वच जण सध्या भोगत आहोत. आपणच केलेल्या चुकांमुळेच आज मागील वेळेपेक्षा मोठे संकट आपल्यावर ओढावताना दिसत आहे. 

आज देशात दररोज सापडणार्‍या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रात दिवसागणीक 55-60 हजार रुग्णांची भर पडत आहे. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे, कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे-नियमांचे सर्वसामान्यांकडून पालन केले गेले नाही. दुसरे कारण म्हणजे, सर्व प्रकारचे विषाणू हे म्युटेंट होतात. म्हणजेच त्यांचे उत्परिवर्तन होते. इन्फ्ल्यूएंझाच्या विषाणूमध्येही म्युटेशन होते. तशाच प्रकारे कोरोनाच्या विषाणूमध्येही असे म्युटेशन झाले आहे. असे म्युटेंटस् काही वेळा वेगाने पसरतात. सद्यस्थितीत आपल्याला ज्ञात असलेल्यांपैकी ब्रिटनमध्ये आढळलेला बी-117 हा म्युटेंट थोडा जास्त वेगाने पसरतो आहे. आज महाराष्ट्रातही कोरोनाची काही म्युटेशन्स आढळून आलेली आहेत. यातील डबल म्युटेंटची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. याला एल 452 आर आणि ई 484 क्यू असे आपण म्हणतो. यातील एल 452 आर या डबल म्युटेंटचे काही प्रकार यापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये आढळून आले होते. महाराष्ट्रात 15 ते 20 टक्के लोकांमध्ये हा म्युटेंट आढळून आला आहे. अशा प्रकारच्या म्युटेंटचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने देशभरातील दहा वेगवेगळ्या प्रयोगशाळांचा एक गट तयार केला आहे. यामध्ये नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रयोगशाळांचा समावेश आहे. जेव्हा जेव्हा असे नवे विषाणू समोर येतील तेव्हा त्यातील पाच टक्के विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. यामुळे विषाणूंच्या म्युटेशन्सविषयीची माहिती समजू शकणार आहे. तसेच त्यातील एखादा म्युटेंट वेगाने पसरत आहे का, हेही समजण्यास मदत होणार आहे. 

हवेतून पसरणारे रोग बंद खोल्यांमध्ये, वायूविजन कमी असलेल्या ठिकाणी जर जास्त लोक असतील तर ते पसरण्याची शक्यता मोठी असते. याउलट मोकळ्या जागी, जिथे कमी लोक आहेत तिथे असे आजार पसरण्याची शक्यता कमी असते. खरे पाहता, ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे; पण याचा आपल्याला विसर पडला. गतवर्षी अनलॉकची प्रक्रिया संपत आल्यानंतर देशात विशेषतः महाराष्ट्रात वाढदिवसाच्या पार्ट्या, विवाह सोहळे, गेटटुगेदर, गॅदरिंग आदी सामूहिक समारंभ पूर्वीप्रमाणे धूमधडाक्यात साजरे झाले. तसेच हॉटेल्स- रेस्टॉरंटस्ही खुले झाल्यानंतर तिथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसली. याचा परिणाम म्हणून आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येकडे पाहिले पाहिजे. वास्तविक, आपल्याकडे जेव्हा रुग्णसंख्या कमी होत होती तेव्हा जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे वाढतच होते. तिथे दुसरी लाट आलेली होती. त्याची भयावहता दिसून येऊ लागली होती; परंतु त्यापासून धडा घेण्याऐवजी आपला समाज मात्र भारतातील आकड्यांचा आलेख कमी होत चालल्याचे पाहून गाफील राहिला. हा गाफीलपणा आपल्याला महागात पडला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

आज देशपातळीवरील स्थिती पाहिल्यास महाराष्ट्रातील बाधितांची संख्या मोठी आहे. पंजाबमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. दिल्लीमध्येही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. विशिष्ट प्रांतातच रुग्णसंख्या का वाढत आहे, याचे नेमके कारण आजघडीला तरी सांगणे कठीण आहे. याबाबत शास्त्रीय अभ्यासाची गरज आहे; पण ज्या ज्या भागात बाधितांची संख्या वाढत आहे तेथे तेथे पुन्हा कठोर निर्बंध आणले जात आहेत. लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जात आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होते. कारण, या काळात लोक घरांमध्येच राहतात. त्यामुळे विषाणूचा प्रसार झाला, तरी तो कुटुंबातील व्यक्तींनाच होतो; बाहेर त्याचे संक्रमण होत नाही. गतवर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसाराचा वेग कमी राहिलेला दिसून आला. असे असले तरी लॉकडाऊनचे दुष्परिणामही दुर्लक्षून चालणार नाहीत. विशेषतः, अर्थव्यवस्थेवर याचे अत्यंत नकारात्मक परिणाम होतात. बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणावर उद्भवते. त्यामुळे लॉकडाऊन की अनलॉक, यामध्ये संतुलन साधत आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. 

इतिहासात जेव्हा जेव्हा समाजापुढे भयंकर संकटे उभी राहिली तेव्हा महाराष्ट्राने संपूर्ण देशाला, जगाला, समाजाला दिशादर्शन करण्याचे काम केले आहे. आज आपण त्याच उंबरठ्यावर किंवा टप्प्यावर उभे आहोत. आज ती वेळ पुन्हा आलेली आहे. आपण काय करायचे आहे? केवळ दोन गोष्टी! एक म्हणजे कसल्याही गैरसमजांवर, अफवांवर जराही विश्वास न ठेवता कोव्हिडची लस घेणे आणि दुसरे म्हणजे लस घेतली असेल वा नसेल तरीही मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करणे. सबंध राज्याने जर एकजुटीने निर्धार करून या दोन्हींचे पालन केले, तर पुन्हा एकदा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, या इतिहासाची आपण पुनरावृत्ती करू शकतो. 

आज महाराष्ट्रात सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण खुले झाले पाहिजे, अशी मागणी सध्या होत आहे. ती योग्य आहे. परंतु, काही वयोगट हे व्हलर्नेेबल असतात. उदाहरणार्थ, 60 वर्षांवरील व्यक्ती किंवा मधुमेह, हृदयविकार आदी आजार असणारे रुग्ण हे आरोग्यद़ृष्ट्या तुलनेने अधिक कमकुवत असतात. त्यामुळे लसींच्या उपलब्धतेचा विचार करून या वयोगटातील लोकांसाठी आणि आरोग्यकर्मींसाठी सर्वप्रथम लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात 45 वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जेव्हा  लसींची उपलब्धता वाढेल तेव्हा 45 पेक्षा कमी वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणाची मोहीम सुरू होईल. परंतु, तोपर्यंत या व्यक्तींनी कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच यदाकदाचित जर कोरोनाची लागण झाली, तर तत्काळ गेल्या तीन-चार दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना याबाबतची माहिती देणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाचा विषाणू हवेतून पसरतो. लसीकरणाबाबत आपण इस्रायलचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. या देशाने मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली. परिणामी, तेथे रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आणि कोरोनाबाधितांची संख्याही घटली. कोरोना ही वैश्विक महामारी आहे. त्यामुळे या संक्रमणापासून आपण तेव्हाच सुरक्षित राहू शकू जेव्हा सर्व देश या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील. तसेच येणार्‍या काळातही विषाणू आपल्या अवतारात बदल करण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर प्रभावी ठरतील अशा नव्या लसींच्या क्लिनिकल ट्रायल्सचीही आपण तयारी केली पाहिजे. 
(लेखक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत.) 

विषाणूंचा चकवा

एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की, विषाणू हे अत्यंत चलाख असतात. त्यांना मानवी शरीरात कसा शिरकाव करायचा, हे अचूक माहीत असते. मानवी शरीर ज्याप्रमाणे या विषाणूंना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते, त्याचप्रमाणे हे विषाणूदेखील जास्तीत जास्त काळ शरीरात राहण्याचा प्रयत्न करत असतात. जितका जास्त काळ ते शरीरात राहतात तितक्या वेगाने त्यांचा गुणाकार होतो. यासाठी ते आपल्याला सतत चकवा देत असतात. अशावेळी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या विषाणूंच्या चकव्याला बळी न पडणे ही आपली जबाबदारी आहे.

दोन्ही लसींचा प्रभाव सारखाच

सध्या देशात कोरोना प्रतिबंधासाठी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसी देण्यात येत आहेत. या दोन्ही लसींच्या परिणामकारकतेमध्ये फारसा फरक नसून, त्यांच्या विज्ञानामध्ये फरक आहे. ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राजेनेकाची जी लस आहे ती स्पाईक प्रोटिनवर अवलंबून आहे. भारत बायोटिकची ‘कोव्हॅक्सिन’ ही लस विषाणूंनाच मारून (हिट किल्ड व्हायरस) टाकते. दोन्हींची रचना वेगळी असली, तरी त्यांचा प्रभाव सारखाच आहे. त्यामुळे विशिष्ट लसच चांगली असल्याने तीच हवी, असे म्हणून अडून न बसता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर जवळपास 45 दिवसांनी शरीरात चांगल्या प्रकारे अँटिबॉडीज् तयार होतात. सध्या वैज्ञानिकांच्या विश्वात नव्या स्ट्रेनवर लसी परिणामकारक ठरतात की नाही, याबाबत मतमतांतरे आहेत, चर्चा-प्रतिचर्चा सुरू आहेत; पण लसीमुळे या आजाराची तीव्रता किंवा घातकपणा कमी होतो, हे निश्चित आहे.