Sat, Aug 08, 2020 14:46होमपेज › Bahar › मांत्रिक

मांत्रिक

Published On: Feb 10 2019 1:09AM | Last Updated: Feb 09 2019 9:52PM
प्रा. सुहास द. बारटक्के

‘सर आहेत का?’ दारातून आत डोकावीत शेजारचे मंगूअण्णा विचारते झाले आणि मी तत्काळ स्वयंपाकघरातून बाहेर आलो. 
‘या, या, अण्णा, काय झालं? काय म्हणताय?’
‘तुम्ही स्वयंपाकघरात वहिनींना मदत करीत होतात की काय?’
‘हो ना अण्णा. करावी लागते थोडी मदत... त्याशिवाय खाऊ कसा मिळणार?’
‘खाऊ?’
‘हो ना भाऊ... खाऊ म्हणजे नाश्ता, जेवण वगैरे हो.’

‘अच्छा अच्छा मला वाटलं खाऊ म्हणजे ते आपलं...’
‘तुम्ही ना अण्णा, या वयातही चावट बोलता... बसा, काय म्हणताय?’
‘आपल्या देशाला म्हणे एका मांत्रिकाने छळलंय...’
‘असं म्हणता? कोण तो? आणि असं कोण म्हणतो?’
‘असं खुद्द उद्धवजी म्हणतात. याचा पेपर...ते म्हणे येत्या निवडणुकीत नागरिकांना भूलथापा देणार्‍या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून नागरिकांना सोडवणार आहेत.’
‘काय म्हणता? असं म्हणाले ते? कोण तो ढोंगी मांत्रिक?’
‘तेच विचारतोय मी तुम्हाला. मला वाटतं त्यांना असं म्हणायचं असेल, की मंत्र्यांच्या तावडीतून मी नागरिकांना सोडवणार.’
‘अण्णा, मंत्र्यांच्या तावडीतून सोडवायचं म्हणजे लोकशाही कशी राहील?’

‘मी सर्वच मंत्र्यांबद्दल म्हणत नाहीय; पण काही मंत्री असे असतात, की जनतेचं मोठं काम केलंय असं भासवतात आणि खिसे भरतात आपलेच. एखादी योजना जाहीर करतात. लोकांना वाटतं, की आता आपल्या खात्यात पंधरा लाख जमा होणार; पण कुणाच्या खात्यात जमा झाले का?’
‘बरोबर आहे अण्णा, अशी खोटी आश्‍वासनं देणं म्हणजेच ढोंग. मध्यंतरी नाही का, त्यांनी सर्जिकल करून पाकला नमवले असल्याचे ढोंग केले होते...’
‘ते खरंच होतं. ढोंग नव्हतं काही.’
‘पण असे सर्जिकल स्ट्राईक या आधीपण करण्यात आले होते ना? फक्त त्याचे व्हिडीओ काढून व्हायरल केले गेले नव्हते.’
‘तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीला ढोंग म्हणाल. एकदा एखाद्यास बदनाम करायचं म्हटलंत, की काहीही म्हणता येतं. तुम्ही नाही का सत्तेत सहभागी होण्याचं ढोंग केलेत? प्रत्यक्षात आत राहून उपद्रवच करीत होतात ना?’

‘करेक्ट! तेच मी म्हणतोय... शेवटी सगळेच ढोंगी असतात हं; पण मांत्रिक कोण हे पाहायला हवं.’
‘तेच मीपण म्हणतोय... लोकांना मंत्र टाकून जिंकणारा तो कोण?’
‘कोण असणार? ओळखा पाहू.’
‘मागची निवडणूक जिंकणारा दुसरा कोण मांत्रिक असणार? आपले तेच!’
‘करेक्ट! त्यांनी मंत्र टाकला आणि लोकांनी कमळाचे बटण दाबले. यावेळी मात्र त्यांच्या मंत्राचा प्रभाव कमी झालाय असं वाटतं?’
‘कशावरून?’

‘अहो, त्यांच्या विरोधात आता त्यांच्या युतीतलेच लोक नाही का बोलू लागलेत? हे उद्धवजी तर रोज रोज बोलतातच; पण आता ते त्यांच्या पक्षातलेपण बोलू लागलेत ना? त्या गडकरींवरचा मंत्राचा प्रभाव कमी झालाय असं नाही तुम्हाला वाटंत? ते तर अलीकडे बिनधास्त वक्तव्य करू लागलेत.’
‘आणि त्यांना खतपाणी देताहेत ते राहुल. केवळ गडकरी यांच्यातच देशासाठी काही करण्याची धमक आहे म्हणे!’
‘त्यांना पक्षात फाटाफूट हवीच आहे ना? ते तसं म्हणणारच; पण अण्णा, बाकी काहीही म्हणा, पण यावेळी जर मांत्रिक बदलला तर चांगला रिझल्ट मिळेल, असं नाही तुम्हाला वाटंत!’
‘हो, मलाही तेच वाटतं... मला वाटतं उद्धवजींनाही तेच म्हणायचं असेल. युती करतो; पण मांत्रिक बदला. द्या टाळी.’.... असं म्हणून अण्णा उठले.