Tue, Aug 04, 2020 11:27होमपेज › Bahar › कल्पनेच्या काठावर 

कल्पनेच्या काठावर 

Published On: Jun 09 2019 1:21AM | Last Updated: Jun 08 2019 8:49PM
वैजनाथ महाजन

फार वर्षांपूर्वी मराठी साहित्यात ‘कल्पनेच्या तीरावर’ अशा मोहक शीर्षकाची एक कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावेळच्या वाचकांना ती बर्‍यापैकी गुंगवूनही  ठेवणारी होती. कारण, कादंबरीच्या लेखकाचे बलदंड नाव आणि तेही एका प्रतिभासंपन्‍न कवींचे असल्याने हा योग जुळून आला. ज्या काळात करमणुकीची व विचारांच्या देवाण-घेवाणीची वाचनाशिवाय अन्य फ ारशी साधने नव्हती. त्या काळात माणसे आपली मने पुस्तकातच रमवत असत आणि ज्यांना शक्य आहे अशी मंडळी नटून-थटून नाटकाला जात असत. त्यातही सिनेमाला जाणे आणि नाटकाला जाणे यातही तरतम भाव केला जात असे. नाटक बघणारी मंडळी आर्थिक संपन्‍नतेच्या कुळातीलच असत आणि त्याशिवाय पहिल्या कोचावर बसून नाटक पाहणे हे अन्य कुणाला फ ारसे परडवणारे नसे. या काळात कथा-कादंबर्‍यांचा खप उत्तम असणे हे स्वाभाविक होते आणि ती त्या काळाची गरजच होती. यातून लेखक, कवींना उत्तम वलय प्राप्‍त होत असे. मिळकत कितपत होत होती, हा भाग तसा वेगळाच मानला पाहिजे; पण लेखनाची धुंदी उतरू नये एवढा  विलक्षण आनंद कवी, लेखक मंडळी निश्‍चित मिळवत असणार, हे उघड होते. अपवादात्मक का होईना; पण लेखक लेखनावर जगणारे होते, हे तितकेच खरे आहे. अशा काळातील ‘कल्पनेच्या तीरावर’ ही कादंबरी होय.

याचप्रमाणे हा काळ कथा-कादंबर्‍यांचा असा दणकट काळ होता. हे निश्‍चित आता वाचन रोडावले आहे, अशी सार्वत्रिक तक्रार ऐकू येते; पण त्यात फ ारसे तथ्य नाही. आता वाचनाच्या दिशा बदलल्या आहेत. नव्या काळाच्या नव्या जाणिवांचे प्रतिबिंब ज्या लेखनातून उमटते  असे लेखन आजही त्याच उत्कटतेने वाचले जाते. एकूणच कल्पना करणे आणि आपण करीत असलेल्या कल्पनांत रममाण होऊन जाणे हा पूर्वांपार मानवी स्वभाव आहे. त्यामुळे  कल्पना रम्य लेखनाला अशा काळात उठाव असणे हे सहज समजून घेण्यासारखे आहे. कदाचित याकरिताच या काळात मराठीच्या शालेय प्रश्‍नपत्रिकेत निबंधाच्या प्रश्‍नांत अन्य विषयाबरोबर एक लघुनिबंध हटकून असायचा. त्यातून विद्यार्थी त्याविषयाची कल्पना कशी करतो हेच परीक्षक आजमावून पाहत असत. कालांतराने यातूनच ललित लेखन पुढे आले आणि मराठी साहित्यात त्याने स्वत:ची वाट निर्माण केली. आज त्याचा एक रस्ता बनलेला आहे. प्रश्‍न असतो तो लेखक, कवी कल्पना कशी करतात आणि केलेल्या कल्पनेला आकार कसा देतात याचाच.  अलीकडे अशा साहित्याला फ ारसे मोल नाही, असे म्हणण्याची पद्धत रूढ झालेली आहे; पण म्हणून या साहित्याचे मोल कमी होते असे मात्र मुळीच नाही.

उलटपक्षी अशा कादंबर्‍यांची पाने उलटणारी मंडळी आज सहज भेटत असतात. कारण, कल्पनेचे कुबेर आणि कल्पनेचे चाहते हे प्रत्येक काळात असतातच असतात. एखादा लोकमान्यांसारखा राष्ट्रपुरुष असा असतो की, ज्याला कथा-कादंबर्‍या आवडत नाहीत आणि तो त्यांच्या वाटेला जात नाही. याचे या महापुरुषाने सांगितलेले कारण असे की, दोन पैशांची अफू  खाल्ली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात. त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशी काय संबंध असणार. मुद्दा बिनतोड आहे; पण ज्या मंडळींना कल्पनेतच हरवून जायचे आहे, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आपण कोण? त्यामुळे ज्यांना  पक्ष्याप्रमाणे हवेत तरंगावेसे वाटते. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे आणि ज्यांना पाण्यात माशासारखे पोहण्याचा आनंद घ्यावयाचा आहे त्यांना तशी मुभा असली पाहिजे. म्हणून रोज कल्पनांच्या मागे धावणार्‍यांची संख्या वाढतच असते. नवनवीन कल्पना पुढे येतात आणि कालांतराने त्या आपल्या शिक्षण व्यवहारातही समाविष्ट होत असतात. म्हणून तर प्रत्येक वीस वर्षांनी शिक्षणाचे प्रारूप बदलत असते, असे म्हटले जाते. यातून मागास शिक्षण आणि प्रगत शिक्षण अशी गटबाजी सुरू झाल्याचे दिसते आहे. प्रश्‍न महत्त्वाचा असा आहे आणि तो शिक्षणाबाबतचाच आहे.

शिक्षणाने मुलांच्या कल्पनांना पंख दिले पाहिजेत, असा आजच्या शिक्षणप्रेमींचा आग्रह आहे. त्याशिवाय प्रतिभावान मुले स्वत:चे विश्‍व निर्माण करू शकणार नाहीत, असे जाणत्यांना वाटते आहे. खरेतर शिक्षणाचे हे कामच आहे की, त्यांनी मुलांना कल्पना करायला शिकविणे आणि त्यानुसार आचरण करायला लावणे असे दुहेरी काम वर्गात व्हावे, अशी प्रत्येक काळाची अपेक्षा असते. म्हणूनच एका थोर समाजसेवकाने भान ठेवून योजना आखा व त्या बेभान होऊन राबवा, असे म्हणून ठेवले आहे. अशा योजना नवनवीन कल्पनांतूनच साकारत असतात आणि अल्पावधीत जनमानसात सहज रुजत असतात. यामुळे आता शिक्षणात पाठांतराच्या उठा-बशा काढण्यावर जोर दिला जात नाही. त्याला जे करायचे आहे ते करण्याची मुभा दिली जाते. त्यामध्ये कोणताही अडसर निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे नवनवीन कल्पनांचा पाठलाग सुरू होत असतो आणि त्याला अनुसरणारी तितकीच मुले आपोआप समोर येत असतात. कुठे एक लाख विद्यार्थी ‘सूर्यनमस्कार’ घालत असतात, तर कुठे मुले गावांना नवे रुपडे यावे म्हणून धडपडत असतात. एका हिंदी सिनेमात एका अपराध्याला न्यायालय जी शिक्षा सुनावते ती ऐकण्यासारखी आहे. त्या तरुण अपराधी माणसाला न्यायमूर्ती असे सांगतात की, ‘अमुक-अमुक गावात जा आणि चार वर्षांत ते गाव केवळ तुझ्या बळावर पालटून दाखव.’

खरेतर ही शिक्षा तशी अत्यंत रोमहर्षकच म्हटली पाहिजे. कारण, न्यायमूर्तींनी या ठिकाणी त्यांच्या कल्पनेला पूर्ण वाव दिलेला आहे आणि त्या कल्पना तो कसा साकारतो हे त्यांना पाहायचे आहे. भविष्यात जर अशा शिक्षा दिल्या गेल्या, तर त्याबद्दल नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही. कारण, कल्पनेइतकीच माणसाची सुधारणा महत्त्वाची आहे. त्याकरिता माणसाला नव्याचा ध्यास लागण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्याशिवाय नवनिर्मिती कशी होणार? आणि त्याचबरोबर सर्जनाचा व्यवहार नित्यनवा कसा होणार? म्हणूनच माणसांच्या मेंदूत कल्पना करण्याचे आणि त्यात हरवून जाण्याचे अजब रसायन विधात्याने निर्माण केलेले दिसते. यातूनच एखादी फू लराणी साकारली जाते आणि अशातूनच अश्रूंची फु ले होत असतात.हा व्यवहार अव्याहत सुरू आहे. पूर्वी लोक रामायण, महाभारतात सारेच लिहून ठेवलेले आहे मग आता नवीन काय लिहायचे, असा एक दळभद्रा प्रश्‍न विचारत असत; पण द्रौपदीच्या सत्त्वपरीक्षेचे काळानुरूप नवनवीन अर्थ शोधले जात असतात. तसे पर्व आपणासमोर येतच असते. त्यामुळे श्रीकृष्ण किती काळ जगला याची चर्चा प्रत्येक काळात होतच राहते आणि त्यावर नवी ‘झिलयी’ चढत असते. नाही तरी लेखक, कवी याहून वेगळे ते काय करत असतो.

तो जुन्यातूनच नवे शोधत असतो आणि त्याला आपण ‘रद्दीतील रत्ने’ म्हणून गौरवत असतो. वारा रोजचाच असतो; पण आपल्या मानसिक अनुकूलतेवर अथवा प्रतिकूलतेवर त्याचे वाहणे अवलंबून असते.  असाच विचार करत आपण कधी सकाळी, तर कधी संध्याकाळी नदीकाठी पोहोचत असतो. आणि कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा असे म्हणत त्या दिशेने टक लावून पाहत असतो. यात जो भावानंद आपणाला मिळत असतो तो केवळ कल्पनातीतच असतो. यातूनच आपल्या फिरण्याच्या जागा  आपोआप निश्‍चित होऊन जातात आणि त्या जागांवर आपण आपल्या घराइतके प्रेम करू लागतो.

मग अशा परिस्थितीत कल्पनेच्या तीरावर आणि कल्पनेच्या काठावर यात फ रक तो काय? फ रक असा की, कल्पनेचा तीर कवींच्या नजरेच्या टप्प्यात असतो आणि इतरेजनांना हाच तीर काठ वाटत असतो आणि मग कधीतरी आपण अशा काठावर उभे राहून शांतचित्ताने नदीला पाहत असतो आणि आपल्या परीने अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या द‍ृष्टीने काठच ठीक असतो. कारण, आपण आपले काठावर बसून पाण्यात प्रतिबिंब न्याहाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अन्य काय करणार. कारण, कल्पनेच्या जगात आपला प्रवेश तसा माफ कच असतो. कधीतरी ती कल्पना साक्षात समोर उभी राहिली की, आपणाला विलक्षण आनंद होऊन जात असतो; पण कल्पनेच्या याच काठावर नव्या क्षितिजाचा वेध घेणारी मंडळी  केव्हाच आकाशात झेपावलेली असतात आणि यातूनच त्यांच्या नव्या कल्पनांचे तीर निर्माण होत जातात. आपणास सुखावत असतात. मग आपण काठावरून आनंद व्यक्‍त करणे हेच श्रेयस्कर नाही काय?