Wed, May 19, 2021 05:20
कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात अव्वल स्थानी; कोरोनाची दुसरी लाट की ‘त्सुनामी’?

Last Updated: Apr 25 2021 6:55AM

डॉ. नानासाहेब थोरात 

कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात अव्वल स्थानी पोहोचला आहे. देश आणीबाणीसद़ृश स्थितीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची टिपणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी ठरेल का? याबाबतचा इतिहास काय सांगतो? ही लाट थोपवण्यासाठी काय करायला हवे? ज्या लसीकरणाकडे संजीवनी म्हणून पाहिले जात आहे त्याबाबत भारतातील स्थिती काय आहे? याचा घेतलेला वेध. 

भारतामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संक्रमण अत्यंत वेगाने पसरत असून, आता आणीबाणीसद़ृश स्थिती निर्माण झाली आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच देश आणीबाणीसद़ृश स्थितीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारला याबाबत राष्ट्रीय आराखडा काय आहे, याची विचारणाही केली आहे. एका दिवसात देशभरात 3.15 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही संख्या उच्चांकी आहे. आजवर जगभरात कोणत्याही देशात इतके कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसात आढळल्याची नोंद नाही. 2 जानेवारी रोजी अमेरिकेमध्ये 3.07 लाख रुग्ण आढळले होते. आज जगभरात आढळणार्‍या कोरोना संक्रमितांच्या संख्येमध्ये भारताचा वाटा 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अवघ्या 15 दिवसांमध्ये दररोज आढळणार्‍या बाधितांची संख्या 1 लाखावरून 3 लाखांवर गेली आहे. अमेरिकेमध्येही अशी संख्यावाढ झाली होती; मात्र त्यासाठी 61 दिवसांचा कालावधी लागला होता. भारतात दोन लाखांचा आकडा तीन लाखांवर जाण्यास अवघे सहा दिवस लागले. दोन आठवड्यांपूर्वी देशात आढळणार्‍या रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा वाटा 50 टक्के असायचा; पण आता कोरोनाचा संसर्ग इतर राज्यांतही झपाट्याने पसरत आहे. 21 एप्रिलच्या दिवशी देशात 3.14 लाख रुग्ण आढळले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील संक्रमितांची संख्या 66,648 होती, तर अन्य राज्यांतील रुग्णांची एकत्रित संख्या सुमारे 2 लाख 48 हजार इतकी होती. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. ऑक्सिजनअभावी गुदमरून जीव जाण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या सर्वांमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसर्‍या लाटेचे थैमान किती दिवस चालणार आणि ते रोखायचे कसे, याबाबत आज देशभरात चिंता व्यक्त होत आहे. 

दुसर्‍या लाटेची तीव्रता

मार्च 2020 ते नोव्हेंबर 2020 यादरम्यान भारतामध्ये कोरोना विषाणूची पहिली लाट आली. नोव्हेंबरनंतर संसर्गाची तीव्रता कमी कमी होऊन फेब्रुवारी 2021 नंतर ती पुन्हा वाढत गेली. या चढ-उताराला आपण लाट म्हणतो आहोत. आज भारतामध्ये दररोज सरासरी तीन लाखांवर रुग्ण संसर्गित होत आहेत. पहिल्या लाटेमध्ये हे प्रमाण जास्तीत जास्त एक लाखापर्यंत गेले होते. संसर्गजन्य रोगांचा इतिहास पहिला, तर पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्रतेची आणि धोकादायक होती. कोव्हिड-19 च्या बाबतीतही हेच घडत आहे. सुरुवातीला युरोपमध्ये पहिली लाट तीव्रतेची आली. त्यावेळी भारतात मात्र रुग्णसंख्या कमी होती. ज्यावेळी युरोप-अमेरिकेची लाट ओसरली तेव्हा भारतामध्ये ती वाढली. संपूर्ण जगाचा विचार केला, तर हाच रोगाचा कल दिसत आहे. आता भारतामध्ये दुसरी लाट आहे आणि तिचा जगातील अनेक माध्यमांनी ‘त्सुनामी’ म्हणून उल्लेख केला आहे. त्यांचे काही अंशी  बरोबरच आहे. फक्त एका महिन्यात 10 हजारांवरून आपली रोजची  रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. युरोपियन देश, अमेरिका, तुर्की तसेच आखाती देशांमध्येसुद्धा अशीच स्थिती आहे. त्यामुळे सध्याची रुग्णसंख्या कमी होऊन ती कमीत कमी दररोज पाच हजारांच्या खाली येत नाही तोपर्यंत ही लाट ओसरली किंवा त्सुनामी संपली, असे म्हणता येणार नाही. 

संसर्गजन्य आजारांचा आजवरचा इतिहास पाहिला तर दुसर्‍या लाटेमध्ये मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. त्याबरोबरच मोठ्या लोकसंख्येला हर्ड इम्युनिटीसुद्धा तेव्हाच आली आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ आणि जॉन हापकिन्स विद्यापीठ यांनी एप्रिल 2020 मध्ये गणितीय मॉडेल तयार करून भविष्यवाणी केली होती की, एप्रिल 2021 पर्यंत भारतामध्ये 30 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यांचे हे अंदाज काही अंशी खरे ठरले आहेत. मागच्याच महिन्यात आपल्या ‘आयसीएमआर’ संस्थने जाहीर केले होते की, देशातील 30 टक्के लोकसंख्येला म्हणजेच जवळपास 35 ते 40 कोटी लोकांना लक्षणे नसलेला (असिम्प्टेमॅटिक) कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे पहिल्या लाटेत नक्की किती लोकांना कोव्हिड-19 झाला हे सांगता येत नाही, तीच परिस्थिती दुसर्‍या वेळीसुद्धा असेल. 

संसर्गजन्य आजार : इतिहास काय सांगतो?

इसवी सन ख्रिस्तपूर्व 430 वर्षांपूर्वी पहिली संसर्गजन्य आजाराची महामारी आल्याची नोंद आहे. पेलोपोनेशियन युद्धाच्या काळात सर्वात आधी नोंद झालेली साथीची ही घटना घडली. हा आजार लिबिया, इथिओपिया आणि इजिप्तमध्ये गेल्यानंतर ग्रीकमधील अथेन्समध्ये याने थैमान घातले. अथेन्सच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 25 टक्के लोक  यामध्ये मरण पावले. टॉयफॉईडचा ताप असल्याचा संशय असलेल्या या आजारामध्ये ताप, तहान, रक्तरंजित घसा आणि जीभ, लाल त्वचा आणि जखम या लक्षणांचा समावेश होता. या आजाराने अथेन्सवासीयांना लक्षणीयरीत्या कमकुवत केले. स्पार्टन्सने केलेल्या पराभवाचा हा एक महत्त्वपूर्ण घटक होता. यानंतरच्या कालखंडात भरपूर वेळा व्हायरस (विषाणू) किंवा बॅक्टेरियामुळे (जीवाणू) संसर्गजन्य रोगाच्या साथी-महामारी आल्या. त्याच्या इतिहासात न जाता अलीकडच्या काळातील म्हणजे गेल्या शंभर वर्षांपूर्वीचे उदाहरण पाहूया. सन 1918 मध्ये आलेला स्पॅनिश फ्लू ही आजपर्यंतचा सर्वाधिक भयंकर महामारी होती. स्पेन देशातील माद्रिद शहरात या रोगाचा पहिला रुग्ण सापडला होता. या एव्हीयन-जनित फ्लूचा परिणाम म्हणून जगभरात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी विमानसेवा आतासारखी नव्हती. पहिले महायुद्धही चालू होते, अशातच पहिल्यांदा युरोप आणि नंतर जहाजामार्गे अमेरिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये हा साथीचा रोग वेगाने जगभर पसरला. त्यावेळी या रोगावर उपचार करण्यासाठी कोणतीही प्रभावी औषधे किंवा लस नव्हती. मार्चमध्ये स्पेनमध्ये सुरू झालेली साथ ऑक्टोबर महिना उजाडेपर्यंत अमेरिका आणि त्यानंतर भारतामध्येही आली. स्पॅनिश फ्लूच्या दोन लाटा आल्या होत्या. यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेने भयंकर नुकसान केले होते. पहिल्या महायुद्धात जेवढे लोक मृत्युमुखी पडले नव्हते त्यापेक्षा अधिक लोक स्पॅनिश फ्लूच्या दुसर्‍या लाटेत मृत्युमुखी पडले होते. कोणतेही लसीकरण न करता किंवा मोठ्या प्रमाणात औषध उपचार न करता स्पॅनिश फ्लूची साथ निघून गेली; जेव्हा बहुतेक संक्रमित व्यक्तींमध्ये एक तर हर्ड इम्युनिटी आली किंवा त्यांचा मृत्यू झाला. 

त्यानंतर सन 1957 मध्ये हाँगकाँग आणि चीनमध्ये आशियन फ्लू नावाची महामारी आली. या महामारीच्या पहिल्या लाटेत सहा महिन्यांत जवळपास 14 हजार, तर 1958 च्या दुसर्‍या लाटेत 11 लाख लोक मरण पावले. याउलट 1981 पासून आफ्रिका-अमेरिका-आशिया असा प्रवास करून एड्सची मात्र कोणतीही लाट आली नाही. वास्तविक, एड्स हा आजारसुद्धा एचआयव्ही या विषाणूमुळे होतो. गेल्या तीस वर्षांत एड्समुळे जवळपास 3.5 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. 2003 साली चीनमध्ये आलेला सार्स, 2014-15 चा मर्स आणि इबोला हेसुद्धा विषाणूमुळे होणारे संसर्गजन्य रोग होते. त्यांना मात्र लगेच रोखता आले. त्यामुळे या विषाणू संसर्गामुळे जास्त जीवितहानीही झाली नाही आणि त्यांची दुसरी लाटही आली नाही. 

एड्ससारखाच अजून एक रोग आजही समाजामध्ये आहे, तो म्हणजे टीबी (क्षयरोग). जीवाणूमुळे होणारा हा रोग औषधे आणि लस शोधूनसुद्धा पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. या क्षयरोगामुळेसुद्धा गेल्या 100 वर्षांत कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले आहेत. मलेरिया किंवा डेंग्यूसारखेसुद्धा रोग अजून समाजामध्ये आहेत आणि त्यानेसुद्धा लाखो लोक दरवर्षी आफ्रिका आणि आशियामध्ये मृत्युमुखी पडताहेत. सगळेच संसर्गजन्य रोग सारखेच नसतात आणि सगळेच लाटेने येत नसतात. काही अतिशय वेगाने येतात आणि निघून जातात; तर काही खूप हळूहळू संसर्ग करतात आणि काही दशके समाजमध्ये राहतात. त्याविरुद्ध समाजाची हर्ड इम्युनिटी (कळप प्रतिकारकशक्ती) तितक्याच हळुवारपणे तयार होते. 

 काय करावे लागेल?

गेल्यावर्षी लॉकडाऊन करून त्यातून बाहेर पडताना जगाकडे कोणताच दुसरा आशेचा किरण नव्हता. यावेळी मात्र तसे नाही. यावेळी लसीचा पर्याय उपलब्ध आहे. जर संपूर्ण देशात लॉकडाऊन केले, तर त्यातून बाहेर पडण्याआधी कमीत कमी 50 टक्के लोकसंख्येला लसींचे दोन डोस, तर 80 टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळाला पाहिजे. त्यावेळी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावे लागेल. परंतु, लसीच्या निर्मितीचा आजचा आणि भविष्यातील वेग पहिला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कमीत कमी वेळेत लसीकरण होणे अवघडच नव्हे, तर अशक्य आहे. यासाठी इंग्लंड सरकारने वापरलेला पर्याय आपण वापरू शकतो. ब्रिटन सरकारने तीन महिने कडक लॉकडाऊन करून 60 वर्षांवरील 95 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस, सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना 100 टक्के पहिला डोस दिला आणि मगच लॉकडाऊन शिथिल केले. हाच प्रयोग इस्रायलनेसुद्धा केला. तिथे तर जवळपास सर्वच लोकांना पहिला डोस, तर 55 टक्के लोकांना दुसरा डोस दिला आणि मग सर्वच निर्बंध शिथिल केले. भारतामध्ये हा प्रयोग कमी वेळेत यशस्वी होणार नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे लसीचा पुरवठा. भारतात सध्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात आहे. 
‘कोव्हिशिल्ड’ची महिन्याची उत्पादन क्षमता ही जास्तीत जास्त 6 ते 7 कोटी डोसेस, तर कोव्हॅक्सिनची फक्त 50 ते 75 लाख आहे. सरकारने रशियन ‘स्पुत्निक-व्ही’ या आणखी एका लसीला परवानगी दिली आहे; पण तिची उत्पादन क्षमतासुद्धा महिन्याला 2 ते 3 कोटी राहील. म्हणजे आपण कितीही वेगाने लसीकरण करायचे ठरवले, तरी महिन्याला जास्तीत जास्त 10 कोटी लोकांना एक डोस देऊ शकतो. याच वेगाने लसीकरण राहिले, तर 80 टक्के लोकसंख्येला पहिला डोस आणि 50 टक्के लोकसंख्येला दुसरा डोस मिळण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे आज तरी आपल्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही. आपण लस उत्पादित कंपन्यांकडून लसींचे आगाऊ डोस आरक्षित करण्यास खूपच वेळ घेतला. जून 2020 मध्येच ‘कोव्हिशिल्ड’ आणि इतर काही लसी उपयोगी ठरतील, असे चित्र तयार झाले होते. तेव्हापासूनच सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेकसोडून इतर कंपन्यांनासुद्धा लसनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित केले असते किंवा नवीन लसीचे उत्पादन करणारे प्लांट लावले असते, तर आज लसीचा तुटवडा जाणवला नसता. अमेरिका-युरोपने त्यांच्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पट लसींची आगाऊ मागणी नोंदवून लस उत्पादित करणार्‍या कंपन्यांना उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारी निधी पुरवला. इंग्लंड सरकरने जून 2020 पासून तीन नवीन लस उत्पादन करणारे प्लांट उभे केले. त्यामधून जास्तीत जास्त लसनिर्मिती सध्या सुरू आहे. त्यामुळे अमेरिका आणि यूकेमध्ये लसींचा तुटवडा जाणवत नाही. दुर्दैवाने आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये भविष्याचा वेध घेऊन योजना आखणारे किंवा सरकारला सल्ला देणारे लोक नाहीत. त्याचा सर्वात मोठा परिणाम आपण कोव्हिड-19 च्या दुसर्‍या लाटेने आणि लसीच्या तुटवड्याने भोगतो आहोत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे म्हणाले होते, सरकारमध्ये भान ठेवून योजना आखणारे आणि ते बेभान होऊन योजना राबवणारे लोक असायला पाहिजेत. त्यामुळे जोपर्यंत असे लोक आपल्याकडे निर्माण होणार नाहीत तोपर्यंत आपण या कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणार नाही.

(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथे मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)