Wed, Jun 23, 2021 02:22
खेळखंडोबा शिक्षणाचा

Last Updated: Jun 05 2021 8:51PM

डॉ. अ. ल. देशमुख,
 ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

कोव्हिड-19 च्या संकटकाळात शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत दीर्घकाळ जी संभ्रमावस्था दिसून आली, त्यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेतील उणिवा ठळक झाल्या. पुढील वाटचाल करताना कोव्हिडची आपत्ती ही संधी मानून आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत. 

सीबीएसईपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. वास्तविक शासन यंत्रणांनी समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन ऑफलाईन परीक्षा घ्यायलाच हव्या होत्या, असे माझे स्पष्ट मत राहिले आहे. यासाठी प्रसंगी प्रश्नांची संख्या कमी करून परीक्षेची वेळ कमी करावी. विज्ञान शाखेचा प्रायोगिक भाग परीक्षेतून वगळावा. केवळ थेअरीवर परीक्षा घ्यावी. परीक्षा टाळायचीच असेल तर विद्यार्थ्यांनी कृती संशोधन प्रकल्प सादर करावा व शिक्षकांनी त्यावर त्यांची ऑनलाइन तोंडी परीक्षा घ्यावी. दहावी व अकरावीच्या गुणांवर इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा, असे वाटते. दहावीची परीक्षाही रद्द केल्यास या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना इयत्ता सातवी, आठवी आणि नववी या इयत्तांचे निकाल शाळांकडे आहेत. या तिन्ही निकालांवरून त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कशी आहे याचा अंदाज लावणे अधिक योग्य ठरेल. याबाबत राज्याचे शिक्षण खाते कोणती भूमिका घेते हे पाहावे लागेल. 

वास्तविक, कोरोनाकाळात आपल्या शिक्षण पद्धतीमधील सर्वच उणिवा एकदमच उघड्या पडल्याचे दिसून आले. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हा शिक्षणाचा त्रिकोण एकदमच उद्ध्वस्त झाला. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टही उन्मळून पडले. खडू-फळा हे एकमेव साधन, घ्या लिहून ही अध्यापन पद्धती व मूल्यमापनासाठी परीक्षा हे एकमेव अस्त्र हे सर्व कुचकामी ठरले. 

गेली अनेक वर्षे आपण नुसते परीक्षार्थी शिक्षण म्हणून चर्चा करत आहोत; पण त्यात मुळापासून बदल करण्यात आपण चर्चेशिवाय काहीही केलेले नाही. आता आपल्याला संधी आली आहे किंवा निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. खरोखर आपल्याला शिक्षणप्रक्रियेत मुळापासूनच बदल केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झालेले आहे. अजून त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यात आपल्याला आवश्यक असणारे बदल वा सुधारणा समाविष्ट करता येऊ शकतात. 

कोव्हिड काळातील दिसून आलेल्या उणिवांचा अभ्यास केल्यास आपल्याला शिक्षणात या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार म्हणजेच 5+3+3+4 या स्तरावर पुढील गोष्टींवर अधिक भर दिला गेला पाहिजे. 

1) डिजिटल सक्षमता 2) आभासी शिक्षण 3) पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन कोर्स) 4) कौशल्य शिक्षण 5) मानसिकता 6) मूल्यमापन केंद्र 7) गृहशाळा या सात मुद्द्यांचा विस्ताराने आपण विचार करूया. 

1) डिजिटल सक्षमता : 

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण ही नवी पद्धत विकसित झाली. यापूर्वी आपल्याकडे अत्यल्प प्रमाणात व मर्यादित संख्येत विद्यार्थी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करत होते. पण गेल्या वर्षभरात त्याची साक्षरता थोडी अधिक वाढलेली आहे. यामध्ये काही अडचणी प्रकर्षाने पुढे आलेल्या आहेत. त्यातील मुख्य अडचण म्हणजे सुरक्षित आणि शहरी वातावरणात वाढलेली धनिकांची मुले आणि असुरक्षित, हलाखीच्या ग्रामीण भागात वाढलेली गरिबांची मुले असे दोन गट आपल्याला प्रकर्षाने जाणवले आहेत. एकसंध समर्थ भारत अशा तर्‍हेचे चित्र डोळ्यासमोर न येता अनेक विविध जाती-जमातीत विभागलेला असा भारतीय समाज आपल्या डोळ्यासमोर येतो. यामध्ये निरक्षर-साक्षर, ग्रामीण-शहरी, अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण मिळालेले विरुद्ध अतिशय कमी दर्जाचे शिक्षण मिळालेले अशा तर्‍हेच्या अनेक गटांत समाज विभागलेला आहे हे दिसून आले. यातील दुसर्‍या गटातील विद्यार्थी डिजिटल साक्षरही नाहीत. त्यांना डिजिटली सक्षम करण्यासाठी शासनाने, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी ‘माहिती तंत्रज्ञान : ओळख व वापर’ हा विषय बालवाडीपासून सक्तीचा केला पाहिजे. शाळेबरोबर या विषयाची जाणीवजागृती शिक्षक व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

शिक्षण क्षेत्रानेच हे काम केले पाहिजे; नव्हे शिक्षण प्रक्रियेचा तो अविभाज्य घटक आहे. शैक्षणिक साधन म्हणून प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याजवळ स्मार्टफोन, टॅब आणि लॅपटॉप असला पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना सीएसआर फंडातून ही साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर टाकली पाहिजे. डिजिटल सक्षमतेचा वयोगटानुरूप स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. त्यामध्ये थिअरीचा भाग कमी असावा व शैक्षणिक अ‍ॅप, पोर्टल तयार करणे, यू ट्यूब, झूम आणि गुगल मीट, व्हिडीओ कॉल, इन्स्टाग्राम, फेसबुक, जीपीएस या बाबतीतील सर्व प्रात्यक्षिकांचा जास्तीत जास्त समावेश असावा. कारण पुढच्या काळात जो विद्यार्थी डिजिटल सक्षम असेल तोच टिकेल, तोच विकसित होईल आणि त्याचेच करीअर घडेल.

2. आभासी शिक्षण : 

एकविसाव्या शतकात शिक्षण ही बदलाच्या प्रक्रियेतील फार मोठी किल्ली आहे. शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठे इथेच फक्त शिक्षण मिळते; एवढ्यापुरता मर्यादित विचार करून चालणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत खालील तीन गोष्टींमधून विचार करावा लागेल.

1. शिक्षण 24 तास उपलब्ध असावे. 2. शिक्षण कोठेही (सर्वत्र) उपलब्ध असावे.
3. पाठ्यक्रम व्यक्तिगत विकासानुवर्ती असावेत.

प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती व आकलन क्षमता वेगवेगळी आहे. त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. यासाठी आपणासमोर वर्गाध्यापन हा एक पर्याय आहे. त्याचबरोबर आभासी शिक्षण हा दुसरा पर्यायही आहे. एकविसाव्या शतकात आपल्याला या दुसर्‍या पर्यायाचा अधिक विचार करावा लागेल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डेटा लर्निंग व अ‍ॅनालिसिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट इत्यादी गोष्टींची ओळख व वापर प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरापर्यंत याचा आंतरभाव करण्याची गरज आहे. आभासी शिक्षणामधून या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील. 

3. पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन कोर्स) : 

नवीन शैक्षणिक धोरणात 5+3+3+4 हा शैक्षणिक आराखडा मांडलेला आहे. प्रत्येक स्तर पूर्ण करून नवीन स्तर सुरू करण्यापूर्वी पूर्वीच्या संपूर्ण स्तराची उजळणी करणारे पायाभूत अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. आत्ताचे उदाहरण घ्या ना, काही मुले यंदा एकदम दुसरीत जाणार आहेत; तर काही जण दहावीच्या वर्गात न शिकता एकदम अकरावीत प्रवेश करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम कार्यान्वित करण्याची गरज आहे. अन्यथा हे विद्यार्थी पुढील वर्गात टिकणार नाहीत किंवा तो पाठ्यक्रम त्यांना अवघड जाईल. पायाभूत अभ्यासक्रम हा शिक्षणाचा एक प्रमुख घटक असला पाहिजे.

4. कौशल्य विकसन : 

शिक्षणातून अपेक्षित असा वैचारिक, भावनिक, तार्किक व कौशल्यात्मक बदल घडवून येण्याची प्रक्रियाच सध्या सदोष झाली आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही सदोष बनली आहे. आज पाठ्यपुस्तकातला आशय हा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही पाठ असला की काम झाले, असे चित्र तयार झाले आहे. यामधून फक्त गुणांचा फुगवटा निर्माण झालेला आहे. अध्यापनातला आनंद, कुतूहल, उत्सुकता, प्रयोग करून पाहणे, निरीक्षण करणे, विविध गोष्टीतील सहसंबंध शोधून काढणे अशा सार्‍या कृतींचा आणि मेंदूच्या दोन बाजूंचा वापर करण्याची संधी मिळून कृतिशीलता आणि स्वप्रयत्नाने ज्ञाननिर्मितीचा अनुभव घेणे हे अपेक्षणे सुद्धा गैर वाटावे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. समाजाला ज्याप्रकारचे मनुष्यबळ हवे त्या तर्‍हेचे धैर्यवान, वेगळा विचार करणारे, स्वयंनिर्णय घेणारे, कल्पक मन असलेले, सहकारी वृत्ती असणारे आणि संवेदनशील मनुष्यबळ शिक्षण व्यवस्था देत नाही हे उघड झाले आहे. शिकणे याचा अर्थ केवळ लेखी परीक्षेसाठी प्रश्नोत्तरे पाठ करणे आणि ती उत्तरपत्रिकेत लिहून मोकळे होणे इतकाच उरला आहे. 21 व्या शतकात ही इतकी मर्यादित शिदोरी घेऊन आपली युवा पिढी वाटचाल करू शकणार नाही. राष्ट्रीय विकासाला समर्थ ठरणार नाही. जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाही. 21 व्या शतकाच्या शिक्षणाकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. 21 व्या शतकासाठी लागणारी कौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत.

1. शिकायचे कसे हे शिकणे.(स्वयंअध्ययन तंत्र) 2. सतत किंवा सातत्याने शिकत राहणे. 3. बहुदिशा विचार करणे. 4. समस्यांना उत्तरे शोधणे. 5. कल्पनाशक्तीचा वापर करून नव्या वाटा शोधणे. 6. नेतृत्व करणे. 7. प्रभावी संप्रेषण कौशल्य निर्माण करणे 8. संगणकावर प्रभुत्व असणे 9. माहिती तंत्रज्ञानात पारंगत असणे 10. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गतीने काम करणे 11. माणूसपण राखणे (मूल्य पाळणे) 

थोडासा विचार केला तर लक्षात येईल की, आज शाळेमधून नुसती माहिती मिळवणे आणि ती पाठ करणे एवढे पुरेसे नाही; तर तिचा वापर कसा करणार हे महत्त्वाचे आहे. एका क्लिकने जगातील माहितीचा सागर समोर येत असलेल्या काळात या माहितीचा वापर कसा करून घ्यायचा हे जमले पाहिजे. शिक्षणामधून विद्यार्थ्यांना हे शिकवले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माणूस कमी वेळात काम उरकू शकतो. त्यामुळे आपल्याजवळ रिकामा वेळ खूप असणार आहे. या वेळेचा सदुपयोग समाजहितासाठी कसा करायचा हे कौशल्य शाळेच्या दिवसांतच शैक्षणिक प्रक्रियेतून शिकवले जाण्याची गरज आहे. आपले अभ्यासक्रम, अध्यापन आणि मूल्यमापन यात आपण बदल केला नाही तर आपले अस्तित्वच धोक्यात येणार आहे. शिकणे आणि जगणे यात पडलेली दरी आपल्याला कमी करावीच लागेल.

5) मानसिकता : 

स्वातंत्र्यप्राप्तीपासून आपण फक्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी काही प्रमाणात बौद्धिक साक्षर होतो; परंतु दैनंदिन जीवनाला सामोरे जाण्यासाठी तो कमकुवत राहतो ही वस्तुस्थिती आहे. वागणे, बोलणे, समाधानी राहणे, परस्पर सामंजस्य, इतरांबरोबर जुळवून घेणे, इतरांचे ऐकणे, नकार पचवणे, संकटाला धैर्याने सामोरे जाणे, शिस्त, आदरभाव पाळणे, चांगल्या सवयी विचार, छंद अवगत करणे यामध्ये आपले विद्यार्थी कमी पडताना दिसतात. या सर्व बाबतीत त्यांची मानसिकता बर्‍याच अंशी नकारात्मक झालेली आहे. शिक्षणामधून ती आपल्याला सकारात्मक करता येईल का? त्यादृष्टीने काही प्रयत्न करता येतील का? याचा विचार करणे गरजेचे आहे. खरे म्हणजे शिक्षणाचा पायाच मुळी मानसशास्त्र आहे. पण त्याचीच परवड आज झालेली आहे. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर आपल्याला मानसशास्त्रीय द़ृष्टिकोनातून अनुभव दिले पाहिजेत. याची नितांत आवश्यकता आहे. 

6) मूल्यमापन : 

कोरोना काळात आपल्या शिक्षण व्यवस्थेची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. आजपर्यंत आपण मूल्यमापनासाठी परीक्षा या एकमेव अस्त्रावर अवलंबून राहिलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थाच कशी धुळीला मिळालेली आहे हे आज आपण अनुभवत आहोत. आपल्याला या बाबतीत क्रांतिकारी बदल करावा लागेल. मला तर असे वाटते की, मूल्यमापन ही प्रक्रियाच शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठ पातळीवरून पूर्णत्वाने वेगळी करावी. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे फक्त शिकवण्याचे काम करतील. मूल्यमापनासाठी वेगळी मूल्यमापन केंद्रे (थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन सिस्टीम) असावीत.  ही मूल्यमापन केंद्रे प्रत्येक गावात किंवा छोटी छोटी गावे असतील तर दोन-तीन गावे मिळून एक याप्रमाणे निर्माण करावीत.

मोठमोठ्या गावातून ती एकापेक्षा जास्तही असू शकतील. त्यांची गुणवत्ता व दर्जा याबाबतीत त्यांना स्वायत्तता द्यावी. त्यावर नियंत्रण मात्र शासनाचे असावे. मूल्यमापनाचे निकषही त्यांना शासनाने द्यावेत. ही मूल्यमापन केंद्रे  विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास इत्यादी क्षेत्रांचे मूल्यमापन करतील. शाळांमधून विद्यार्थी वर्ष पूर्ण झाले की पुढच्या वर्षात जाईल. पालकांनी आपापल्या मुलांचे मूल्यमापन या मूल्यमापन केंद्रावर जाऊन  करून घ्यावे. यामधून एक प्रकारे मूल्यमापन पारदर्शकपणे होईल आणि विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत कितपत विकसित झाला आहे हे समजून येईल. मूल्यमापन केंद्रांनी मात्र त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा, शिक्षणतज्ज्ञांचा, नवनवीन कल्पनांचा वापर करून मूल्यमापनाचे तंत्र विकसित करावे. मग ते ऑफलाईन असो वा ऑफलाईन.  यामुळे परीक्षा हा वाईट शब्द शिक्षणातून आपोआप हद्दपार होईल आणि आज जी समस्या उद्भवलेली आहे ती उद्भवणार नाही. मूल्यमापन हा शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे मूल्यमापन केंद्राने जेवढी जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करता येईल, तेवढी करावी. 

7) गृहशाळा : 

21 व्या शतकामध्ये आपल्याकडे मुक्त शिक्षणाचा किंवा गृहशाळेचा विचार करावा लागेल. गृहशाळा म्हणजे प्रत्येक घरीच व्हायला पाहिजे असे नाही तर गावामध्ये वेगवेगळी अभ्यास केंद्रे तयार व्हावीत. समाजसेवक, सामाजिक संस्था या समाजातील घटकांनी यामध्ये लक्ष घालून कमीत कमी पैशामध्ये ही अभ्यास केंद्रे चालवावीत. गावातील समाज मंदिरे, धनिकांकडे असलेल्या मोठमोठ्या जागा याचा यासाठी उपयोग करता येईल. प्रत्येक गल्लीत ही गृहशाळा किंवा अभ्यास केंद्रे तयार झाले तर विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये मागे पडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना यामधून समान संधीही प्राप्त होईल. फक्त यासाठी समाजातील विषमता कमी करण्यासाठी समाजातील सुशिक्षित, सुसंस्कृत, धनिक लोकांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे सुचवावे असे वाटते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण फक्त शिक्षणातल्या दोषांची रीच ओढत आलेलो आहोत. आता अगोदरची आणि नवीन पद्धती यांचा समतोल साधून आपल्या मुलांना त्यांचे भविष्य सुरक्षित, विकसित, उज्ज्वल करणारे शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे. यासाठी आणखी आयोग आणि समित्यांची नेमणूक न करता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे मानून काम केल्यास शिक्षणामधून आपला भविष्यकाळ उत्तम आहे.