Tue, Sep 29, 2020 20:06होमपेज › Aurangabad › विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट!

विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट!

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 11:22AM

बुकमार्क करा

सोयगाव : प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील येथे गावठी दारू बनविणार्‍यांनी पोलिस करवाईच्या भीतीने दारूचे ड्रम विहिरीत ओतून रिकामे केले. विशेष म्हणजे याच विहिरीतून तालुक्यातील निमखेडी गावाला पाणीपुरवठा होतो. मग काय, या गावठी दारूमिश्रित पाण्याचा गावाला पुरवठा झाला अन् अख्खे गाव तर्राट झाले. दारूमिश्रित पाणी पिल्याने काही गावकर्‍यांना ढाळ-उलट्यांचा त्रासही सुरू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. 

घटनेबाबत गावकर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील निमखेडी हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर वसलेले गाव. या गावाच्या शिवालाच जळगाव जिल्हा सुरू होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) या गावातील धरणालगत निमखेडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहीर बांधलेली आहे. या विहिरीतून निमखेडीला पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. रविवारी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. त्या वेळी पाण्यातून उग्र वास येत होता; परंतु पाण्यात जास्त प्रमाणात क्‍लोरिन टाकले गेले असावे, असा गावकर्‍यांचा समज झाला. मात्र, हे पाणी पिल्यानंतर अनेकांना गुंगी आली. तर काही जणांना अचानक ढाळ-उलट्यांचा त्रास सुरू झाला. या गावकर्‍यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 

विहिरीत आढळली चक्‍क दारू

पाण्यातून गाव झिंगल्यानंतर सरपंच सीमा पाटील, ग्रामसेवक सत्यनारायण पुल्लेवाड यांनी तातडीने पाणी पुरवठ्याच्या विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा विहिरीच्या आजूबाजूला गावठी दारू बनविण्याच्या हातभट्ट्या व ड्रम दिसून आले. शिवाय विहिरीतील पाण्याचा वास घेतल्यानंतर त्यातून दारूचा उग्र वास येऊ लागला. त्यानंतर गावचा पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात आला आणि विहिरीतून पाण्याचा उपसा करून तो खाली सोडण्यात आला. 

अवैध हातभट्टीवाल्यांचे कारस्थान
औरंगाबाद आणि जळगावच्या सीमेवर अवैधरीत्या गावठी दारू बनविण्याचे अनेक अड्डे आहेत. दारू बनविण्यासाठी पाणी आणि निर्मनुष्य जागा लागत असल्याने निमखेडीच्या सार्वजनिक विहिरीच्या भोवतीही आरोपींनी हातभट्टी लावलेली होती. मात्र, पोलिस कारवाईच्या भीतीने आरोपींनी बनविलेली दारू विहिरीत ओतून पळ काढला असावा आणि त्यातून हा प्रकार घडला, असा गावकर्‍यांचा संशय आहे. या प्रकरणी ग्रामसेवकांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध काल तक्रारही नोंदविली आहे.  तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष गणेश परदेशी, माजी सरपंच परमेश्वर शिंदे, सदस्य नाना शिंदे, चरण परदेशी, अमोल कुलकर्णी, बाबाजी परदेशी, पोपट पांडे,आदींनी संबंधित दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव हरे पोलिसात केली आहे.

रविवारी गावात उग्र वास येत असलेले पाणी आले. ते पाणी पिल्याने गावातील वीस-पंचवीस जणांना त्रास झाला. यामुळे आम्ही विहिरीकडे पाहणीसाठी गेलो. विहिरीजवळ आम्हाला दारूची भट्टी आढळून आली. या भट्टीतील दारूच विहिरीत मिसळण्यात आल्याने हा प्रकार घडलेला आहे.  याबाबत सोमवारी  पिंपळगाव(हरेश्वर) ता. पाचोरा यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही.
- सीमा पाटील, सरपंच, निमखेडी.

शनिवारी व रविवारी पाणी गावास पाणीपुरवठा करण्यात आला; परंतु ते दूषित असल्याचे लक्षात येताच तत्काळ पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर दोन, तीन वेळेस विहिरीचा उपसा काढण्यात आला तरीसुद्धा पाण्याचा उग्र वास  येत आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
- सत्यनारायण पुल्लेवाड, ग्रामसेवक, निमखेडी.
 

वाचा : विहिरीत दारु मिसळल्यानंतर गाव म्हणते हातपंपच बरा