Sat, Aug 15, 2020 13:57होमपेज › Aurangabad › वजनापूरमध्ये अनोख्या आळीचे थैमान 

वजनापूरमध्ये अनोख्या आळीचे थैमान 

Published On: Jul 11 2019 10:50PM | Last Updated: Jul 11 2019 10:50PM
गंगापूर : रमाकांत बन्सोड  

गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावात गेल्या चार दिवसांपासून अनोख्या आळीने गावात थैमान घातले असून, वजनापूरसह परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी व गावकरी भयभीत झाले आहेत.
एखाद्या लष्कराच्या पथसंचालनासारखे या आळ्या एका रांगेत लयबद्ध पद्धतीने चालतांना दिसत असून दहा ते एकशे वीस फुटांच्या रांगा पाहिल्यावर या अळ्या माणसावर हल्ला करतात काय अशी भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

या आळ्या जमिनितून निघून एकत्र पद्धतीने पुढे चालत असतात. या आळ्या नुसत्या चालतच नसून वेगवेगळे आकारही दाखवत आहेत. सरळ चालताना सापसारख्या दिसणाऱ्या आळ्या क्षणात ऑक्टोपस सारखा आकार धारण करतात. या आळ्या नेमक्या कोणत्या जातिच्या आहेत, याचा खुलासा झालेला नाही. गावातील साठ सत्तर वर्षाच्या लोकांनी या अशा प्रकाऱ्या आळ्या या आधी पहिल्या नसून, भीतीने गावात नुसता कल्ला झाला आहे. लोकं रात्री झोपतही नाहीत. कधी आळ्यांची रांग येईल आणि कधी अंथरुणात शिरेल याचा थांगपत्ता नाही म्हणून गावकरी उंच ठिकाणी, घरावर, टेरिसवर झोपत असून रोबोट चित्रपट सारखा रोबोट जसे आकार धारण करतो तश्याच या आळ्या जमिनीवर, भिंतीवर, घराच्या छतावर दिसत आहेत.

माजी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात माहिती देऊन प्रशासनाला कळवले आहे.

आज (गुरूवारी) तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी वजनापूर गावाला भेट देऊन या अनोख्या अळीची पाहणी करून माहिती घेतली- पुढारी ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, या आळी विषयी माहिती नाही, आळीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत काहीच सांगता येणार नाही. 

तालुका कृषी अधिकारी यांच्या समवेत यावेळी माजी सभापती संतोष जाधव, मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, उप सरपंच पोपट चव्हाण, संजय चव्हाण, कडू कांबळे, बाळू करडे, मनसुख चव्हाण, सोपान चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण, मोठ्या संख्येने गावकरी आणि शेतकरी उपस्थित होते.

चार दिवसांपासून वजनापूर गावात अनोख्या आळीने गावात थैमान घातले असून, आळ्या माणसावर हल्ला करतात काय अशी भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली.

सजय शेळके, गावकरी, वजनापूर

लेखी माहिती देऊन प्रशासनाला कळवले आहे .कृषी अधिकारी यांच्याशिवाय अद्यापही कोणी दखल घेतली नाही. आळ्या हल्ला करतील या भितीने गावकरी उंच ठिकाणी झोपत आहेत.

संतोष जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य