Tue, Sep 29, 2020 18:15होमपेज › Aurangabad › गंगापुरातील शेतकर्‍यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडले

गंगापुरातील शेतकर्‍यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडले

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:31AM

बुकमार्क करा

गंगापूर : प्रतिनिधी

गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी दि.6 बुधवार रोजी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून ऊर्जामंत्री व कृषीमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून महावितरण कार्यालयाकडे जाणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी अडविले व पोलिसव्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेत अटक करून नंतर सोडून देण्यात आले. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. गंगापूर, वैजापूर, खुलताबाद तालुक्याची 50 पैसे आणेवारी करून दुष्काळ जाहीर करा, बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या, सक्तीची वीजबील वसुली बंद करून तोडलेले कनेक्शन्स त्वरित जोडा, विनाअट सरसकट कर्जमाफी द्या, या व इतर मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन सरकारविरोधी घोषणा देत शेतकर्‍यांनी शहर दणाणून सोडले.

त्यानंतर महावितरण कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी शेतकर्‍यांनी मोर्चा वळवला गणपती मंदिर चौकामध्ये अचानक काही शेतकर्‍यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या फोटो असलेल्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा मोर्चामध्ये आणून चालायला सुरुवात करताच पोलिसांनी झडप घालून दोन्ही प्रेतयात्रा ताब्यात घेतल्या. प्रेतयात्रा काढणार्‍या शेतकर्‍यांना दंगाकाबू पथकाने पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यास सुरुवात केली यावेळी जि. प. चे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्यासह आंदोलक शेतकर्‍यांसह पोलिसांनी अटक केली. शेतकर्‍यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेल्यानंतर शेतकर्‍यांचा मोठा जमाव पोलिस स्टेशनबाहेर जमा झाला होता. काही तास पोलिस ठाण्यामध्ये ठेवल्यानंतर शेतकर्‍यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलनात जखमी झालेल्या संतोष जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, शेकापचे महेश गुजर, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, प्रहारचे राहुल पारखे व इतरांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आंदोलनाला शेतकर्‍यांसह शेतकरी कृती समिती, शेकाप, संभाजी ब्रिगेड, छावा, शिवबा संघटना, प्रहार संघटना, बळीराजा शेतकरी संघटनेसह अनेकांनी पाठिंबा दर्शवून सहभाग घेतला.

जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश असल्याची कलम 149 नुसार प्रतिबंधक कार्यवाही करून सुद्धा पोलिसांना न जुमानता मोर्चा काढून प्रेतयात्रा काढण्याच्या तयारीत असणार्‍यांना पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून प्रेतयात्रेसह मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक सोडून देण्यात आले.  
चंदन इमले पोलिस निरीक्षक. गंगापूर.