Tue, Sep 29, 2020 10:52होमपेज › Aurangabad › थिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ

थिएटरमध्ये नेता येतील पाणी बॉटल-खाद्यपदार्थ

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:23AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

थिएटरमध्ये जाणार्‍या ग्राहकांना पाण्याची बॉटल, घरचे-बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. थिएटरमध्ये सोडताना पाणी व खाद्यपदार्थ असल्याची खात्री करून घेता येईल, मात्र ते आत नेण्यास बंदी घालता येणार नाही. तसेच शाळा-कॉलेजवाल्यांनाही विद्यार्थ्यांकडून पार्किंगसाठी पैसे घेता येणार नाही. असे प्रकार झाल्यास ग्राहकांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार करावी. संबंधित थिएटरचालकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

15 ते 31 डिसेंबरदरम्यान घेण्यात येणार्‍या ग्राहक जागरण पंधरवड्यासंदर्भात बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, अन्न व औषध आणि वजन व मापे विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मॉलमध्ये पार्किंग, थिएटरचालकांकडून खाद्यपदार्थ विक्रीवर अवाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, थिएटरचालकांचा धंदा हा चित्रपट दाखवणे आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाणी बॉटल, खाद्यपदार्थ नेण्यास अडवता येणार नाही. बाटलीत अ‍ॅसिड नव्हे पाणी आहे, तर खाद्यपदार्थात बॉम्ब नाही, याची खात्री करण्यासाठी तपासणी करू शकतात. मात्र अडवणूक कदापि करता येणार नाही. असे केल्यास संबंधित थिएटरचालकांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच एक विशेष मोहीम राबवून प्रत्येक थिएटरमध्ये ठळक अक्षरात पाणी बॉटल-खाद्यपदार्थ नेण्याबाबत सूचनाफलक लावण्यात येतील. 

मॉल, शाळा-कॉलेज, खासगी क्‍लासेसवाले विद्यार्थ्यांकडून पार्किंग शुल्क घेतात. पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी असल्याचे दाखवून एफएसआय घेतलेला असतो. त्यामुळे पार्किंग शुल्क घेणे म्हणजे ग्राहकांची एकप्रकारे लूट आहे. असे शुल्क वसूल करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह वजन व मापे, अन्न-औषध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ग्राहकांनो.., आपल्या हक्‍कासाठी भांडा, 
कायद्याने ग्राहकांना संरक्षण दिलेले आहे. दुकानदार, व्यावसायिक, मॉल, थिएटरचालक असा कोणत्याही सेवा देणार्‍या संस्थांकडून ग्राहकांची लूट केली जात असेल, तर ग्राहकांनी मोठ्या आवाजात त्यांना जाब विचारावा. त्यांच्याशी हक्‍कासाठी भांडावे. होणार्‍या छळ व आर्थिक लुटीसंदर्भात बिले, पावती, लेखी पत्र आदींद्वारे पुरावे जमा करून जिल्हाधिकारी किंवा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.