Sat, Aug 08, 2020 11:23होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : बांधावर राहुदे दुकानापर्यंत तरी खते पोहोचवा; शेतकऱ्यांची मंत्र्यांकडे मागणी! (video)

औरंगाबाद : बांधावर राहुदे दुकानापर्यंत तरी खते पोहोचवा; शेतकऱ्यांची मंत्र्यांकडे मागणी! (video)

Last Updated: Jul 10 2020 1:38AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

राज्याच्या कृषिमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन करून साठेबाजी करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतरही औरंगाबादमधील शेतकऱ्यांपर्यंत खते पोहोचत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. चिकलठाणा येथे खत घेण्यासाठी आज (दि. ८) शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. शेतकऱ्यांना कित्येक तास रांगेत उभे राहिल्यानंतर दोन बॅग हाती पडत आहेत. त्यामुळे बांधापर्यंत राहुदे तर किमान दुकानापर्यंत तरी युरिया पोहोचवा अशी मागणी त्रस्त शेतकरी करत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात आज १६६ रुग्णांची वाढ

जून महिन्यात जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला परिणामी पिकेही चांगली आली आहेत. तर काही भागात जास्त पाऊस झाल्याने पिके पिवळी पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता खत खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर चकरा मारत आहेत. खत कधी येणार अशी विचारणा करुन शेतकरी दमला आहे. शेतकऱ्यांकडे दुकानदाराने सांगितलेल्या दिवसाची वाट पहावी पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

चिंताजनक! कोरोना हवेतून पसरतो; पुरावे मिळाले

चिकलठाणा येथे आंबेडकर चौकात खतांची दुकाने असून चार - सहा दिवसाांनी या ठिकाणी खतांची गाडी येते. गाडी आल्यावर रांगा लावून शेतकऱ्यांना खत द्यावे लागते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन बॅग खतावर समाधान मानावे लागत आहे.

आता शेतकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून शासनाने बांधापर्यंत खत ही योजना आणली आहे. परंतु सर्वच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रांगेत उभे राहावे लागत आहे.  कृषीमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, किमान दुकानापर्यंत तरी मुबलक खत पोहोचवावे, एका एका शेतकऱ्याला किमान दहा गोण्या खत मिळेल, असे नियोजन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मागील चार-पाच वर्षात खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्या नाही, आता असे का होत आहे, कृषी मंत्र्यांनी स्टिंग केल्यानंतरही खताचा प्रश्न सुटला नाही. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही, ब्लॅकने घ्यावे लागते, यातून शेतकऱ्यांची लूट होत आहे. नियोजनाच्या अभावामुळे हे प्रकार घडत आहेत. 
मदनकाका नवपुते,  जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

आपल्या जिल्हाला वर्षाला एक लाख मेट्रिक टन युरिया लागतो. यंदा आतापर्यंत ६८ हजार मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे वार्षिक विक्रीच्या ६८% हे प्रमाण आहे. गेल्यावर्षी जूनअखेरपर्यंत २४ हजार ६४२ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा खत विक्री जास्त झालेली आहे. पैसा असलेले शेतकरी रब्बी हंगामासाठीही आताच खत घेऊन ठेवत आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही. शेतकऱ्यांनी खताचा साठा करू नये गावातील गरीब शेतकऱ्यांना  शिल्लक खत उसनवारीवर द्यावे, त्यांची गरज भागवावी,  असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले आहे.