Tue, Aug 04, 2020 11:16होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : लॉकडाऊनने रोजगार गेला, घरमालकाने काढले बाहेर, कुटूंबाचा उड्डाणपुलाखाली आसरा (video)

औरंगाबाद : लॉकडाऊनने रोजगार गेला, घरमालकाने काढले बाहेर, कुटूंबाचा उड्डाणपुलाखाली आसरा (video)

Last Updated: Jul 12 2020 1:25AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

रमेश आणि रमाबाई सोनवणे हे दाम्पत्य हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करायचे. एका अपघातात रमेश सोनवणे जायबंदी झाले. त्यातच कोरोना लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने रमाबाईचाही रोजगार गेला. तीन महिन्यांचे भाडे थकल्याने अखेर घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. अशा परिस्थितीत या कुटुंबाने चार अपत्यांसह क्रांती चौक उड्डाणपुलाखाली संसार थाटला आहे. 

अधिक वाचा : औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरूच

रमेश सोनवणे हे समर्थनगरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत. मार्च महिन्यात कोरोना लॉकडाऊन लागण्यापूर्वी ड्युटीवरून परत येत असताना त्यांना एका बुलेटस्वाराने उडवले. त्यानंतर जायबंदी झालेले सोनवणे गेल्या चार महिन्यांपासून घरीच आहेत. हॉटेल सुरू झाल्यानंतर कामावर ये, असे हॉटेल मालकाने सांगितले, पण अद्याप हॉटेल उघडले नाही. त्यातच शिल्लक असलेली जमापुंजी औषधोपचारावर खर्च झाली.

अधिक वाचा : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भावाला कोरोनाची लागण

रमेश सोनवणे यांच्या पत्नी रमाबाई या देखील एका हॉटेलमध्ये स्वयंपाक, धुणीभांडी करून संसाराला हातभार लावत होत्‍या. त्यांना मासिक सहा हजार रुपये वेतन मिळायचे. त्यातून घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण, कपडे यासाठी त्या खर्च करीत असत. लॉकडाऊनमुळे चार महिन्यांपासून हॉटेल बंद असल्याने त्यांचाही रोजगार बुडाला. अशा परिस्थितीत तीन महिन्यांचे भाडे थकल्याने घरमालकाने घराबाहेर काढले. 

अधिक वाचा : कल्याण डोंबिवलीत सुद्धा लॉकडाऊन वाढला

अचानक कुठे जायचे म्हणून या दाम्पत्याने दोन मुले, दोन मुली, अशा चार आपत्यांसह गेल्या चार दिवसांपासून क्रांती चौक उड्डाणपुलाखाली ठाण मांडले. पती आजारी नसते, तर त्यांनी इतर कोणतेही काम करून संसाराचा गाडा ओढला असता. माझी धुणी-भांडी करण्याची इच्छा आहे, परंतु कोरोनामुळे कोणी कामदेखील देत नाही, अशी खंत रमाबाई यांनी व्यक्त केली.