Mon, Sep 28, 2020 08:55होमपेज › Aurangabad › ‘हेल्थ पॉलिसी’च्या नावाने कोट्यवधींचा गंडा

‘हेल्थ पॉलिसी’च्या नावाने कोट्यवधींचा गंडा

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हेल्थ पॉलिसीच्या नावाने सर्वसामान्यांच्या आर्थिक पुंजीवर डल्ला मारणारे आणखी एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.  गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा आणि विमा सुविधा देण्याचे आमिष दाखवून फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस लि. मुंबई या कंपनीने शेकडो औरंगाबादकरांना कोट्यवधींना लुटले. या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांसह सहा संचालकांविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शहरातील जवळपास 96 नागरिकांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. ‘मैत्रेय’नंतर हा मोठा घोटाळा समोर आला आहे.

नंदलाल केसन सिंग, थक्के मधाथील श्रीधरण नायर, सेबबीस्टीन मल्लीकल, मीनबहादूर केसर सिंग (सर्व रा. गोराई-2, बोरिवली पश्‍चिम, मुंबई), विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. उस्मानपुरा पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अतुल बालासाहेब जाधव (रा. सारा बिल्डिंग, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद आहे. त्यांनी फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीत 2005 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. नऊ वर्षांत दुप्पट परतावा आणि विमा सुविधा तसेच वैद्यकीय उपचार मोफत देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आले. दरम्यान, 2018 पर्यंत त्यांनी गुंतवणूक सुरू ठेवली. मात्र, कंपनीने दुप्पट परतावा तर सोडाच, मूळ रक्‍कमही परत केली नाही. अशाच पद्धतीने जवळपास 96 लोकांनी वेगवेगळ्या रकमेची गुंतवणूक केलेली आहे. या सर्वांना एकूण 11 लाख 67 हजार 925 रुपयांचा गंडा घातला आहे.